Sunday, 16 July 2017

                                                                                                                       १० जून 



                                      चलो भाई, आखिर हमरा भी सेल्फी निकला!!!!



                            




                                    चलो भाई, आखिर हमरा भी सेल्फी निकला!!!!








                 हो अगदीच खरेय!..
   
                  काय खरेय ,म्हणून काय विचारताय?

             अहो, पाऊस पडून गेला तरी हवेतील गरमी काही कमी होईना. म्हटले थोडेसे झाडीत जाऊन बसावं अन् तिथे येणारे पक्षी पण पाहावेत म्हणून घरासमोरच्या झाडीत पक्षी पाहायला गेले होते. पंधरा वीस मिनिटे बसून राहिले पण एकही पक्षी येण्याचे नाव घेईना. तेवढ्यात झाडीत सहज म्हणून लावलेल्या जुई च्या खोडावर आकर्षक लालसर असे काहीतरी दिसले. पाहते तर एक सुंदरसा चिंचोक्याच्या आकाराचा किडा दिसला. सहा पाय, तोंडावर मिशासारखे असणारे दोन अवयव   अाणि अंगावर सुंदर अशा लाल व काळ्या रंगाचं काँबिनेशन असल्यामुळे पाहताक्षणीच त्याच्याकडे लक्ष वेधून घेणारा हा किटक....या किटकाला  लेडी बग, भिंगोटा ,हिटलरअशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतात.
                    मला तर खुपच आनंद झाला होता. मी त्याच्याकडे कौतुकाने पाहतेय तोपर्यंत त्याच खोडावर खालून आणखी एक तसलाच किडा आला..मग तर काय सांगता राव...मी उड्याच मारायच्या बाकी होत्या.(पण नाही मारल्या...कारण खाली काटे होते). मग काय, झालं की निरिक्षण सुरु. जो पहिल्यांदा वर आलेला किडा होता तो वर न जाता तिथेच थांबून राहिला. खालून येणारा किटक हा वर आलेल्या किटकापेक्षा थोडासा लहान होता. दोघांच्या आकारमानाचा विचार करता मागून येणारी ही मादी असल्याचा ढोबळमानाने अंदाज काढला. जोपर्यंत मादी त्याच्याजवळ आली नाही तोपर्यंत तो एक पाऊलही पुढे गेला नाही.... मला खरंच त्याच्या एकाच जागेवर ती येईपर्यंत थांबण्याचे कौतुक वाटले.(नाहीतर आमच्या सगळ्यांचे हे बघा...नुसती मागं घाईच घाई....अगं, झाले का नाही अावरून अन् किती वेळ लावतेस?...असे बरेच काही). या किटकांच्या जीवनाचं मानवी जीवनातील कितीतरी गोष्टींशी साधर्म्य होते. जसे काही तीपण घरचे काम आवरून अाल्यामुळे तिला उशीर झालाय अाणि त्यामुळे ती लगबगीने जाऊन त्याच्याजवळ थांबली. मग मात्र दोघे एकामागोमाग एक निघाले. म्हणजे हे दोघं प्रेमी युगल किंवा जोडपं असल्याचे माझ्या लक्षात यायला तसा काही वेळ लागला नाही हं.... ( मनातच म्हटले..फिरा फिरा प्रेमिकांनो..तुमचेच दिवस आहेत. तुम्हाला कोण अडवतेय...?)
ते जुईचे खोड खूपच उंच जाऊन काटेरी झाडाच्या आधाराने पण दिमाखात अगदी वर जाऊन बसलेय. याच खोडावर हे प्रेमीयुगल जसे काही फिरायला चालल्यासारखे चालले होते..आता हे वर कुठपर्यंत जाणाार म्हणुन मी खोड वरपर्यंत पाहू लागले...... तर काय??. थोडेसे वर आणखी एक जोडपं प्रणयलिलेत मग्न झाले होते. मी तर अवाक् च झाले. पाहतो एक जोडपं अन् देव दाखवतो दोन जोडपी!!.(मागतो एक डोळा अन् देव देतो दोन डोळे...अशातलाच काहीसा प्रकार). आता मात्र काट्यातून बाहेर गेल्यावर का असेना उड्या मारायच्याच असे ठरवून निरिक्षण सुरू केलं. मोबाईल तर हातात होताच.. मग त्या दोघांची प्रणयलीला संपेपर्यंत या दोघांचे फोटो काढायला सुरुवात केली. यातील नराने तिथेच सू केली...( जसे काही मानवी जीवनातील रस्त्यावरचा अनुभव तिथेही पाहायला मिळाला.) ब-याच वेळानंतर प्रणयलीला संपवून ते दुसरे दोघेही फिरायला निघाले...त्यातील पण नरानेच रस्त्यावरच सू केली . खरं तर हे मला शूट करायचे होते. पण कॅमेरा वगैरे काढेपर्यंत त्यांचे कार्यक्रम संपलेले होते.( शाळेतील मुलांना किटकांचे जीवन दाखवण्याच्या उद्देशाने शूट करायचे होते. )... मग चौघेही एकामागोमाग एक निघाले..हे दृश्य अगदी लाल रंगाच्या गाड्या एकामागोमाग एक ओळीत निघाल्यासारखे वाटत होते.( एवढे सगळं होईपर्यंत दोन, अडीच तास नक्कीच वेळ लागला..)
खूपच उंच खोडावर जरी हे प्रेमीयुगुल जात होते तरी माझ्या मतानुसार जणू काही ते एव्हरेस्ट च चढत होते अन् जाता जाता म्हणत होते ,,, भाई, हमरा भी सेल्फी निकालो ना!!!!!( फोटो काढताना मलाही ड्रेस बदलून यायला भाग पाडले या युगुलांनी)..




                                                                                                  श्रीम. कृष्णा कांबळे


No comments:

Post a Comment