आमच्याकडे वारी येते. वारीत बायका येतात. पुरुष येतात. अबाल वृद्ध येतात. आनंद येतो, आपुलकी येते. दु:खही येतं. धर्म येतात, रंग येतात, जातीनं हजर होऊन जाती येतात. बैल येतात, घोडे येतात. फुले येतात. व्यवसाय बहरतात. तुळसही येते. पोलीस येतात. वेगवेगळ्या यंत्रणा यात सामील झालेल्या असतात. पाणी येतं. यासारख्या असंख्य, अरंग गोष्टी अनंत रंग घेऊन येतात.
ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला पालखी देहूतून निघाल्यापासून आमचं तिच्या हालचालीवर लक्ष असतं. या पालखीचं प्रस्थान झालं की झालं उभ्या महाराष्ट्रातील पालख्या निघण्याच्याच तयारीत असतात. सेनापतीने आदेश द्यावा नि सार्या सैनिकांनी सज्ज व्हावे तसे.
त्यानंतर *'पालखी आज कुठे आली?'* हा प्रश्न पंधरा दिवस रोज नव्याने घराघरात उगवतो. प्रश्नाचं उत्तर घेऊन पालखी रोज एकेक गावे पुढे सरकते. ती जसं पुढं सरकते तसे आमच्याकडचे लोक धावण्याच्या शर्यतीत जसा खेळाडू वेगवेगळ्या अंकाच्या काऊंटला वेगवेगळ्या पोजिशन मध्ये असतो तसे तयारीत असतात. नियोजित लोक नियोजित ठिकाणी येणार असल्याने गावंच्या गावं वेगवेगळ्या ठिकाणाहून येणार्या वारकर्यांच्या प्रतिक्षेत असतात. वारकर्यांच्या स्वागतास सज्ज असतात.
दिंड्या पताकात सगळा रस्ता लाल होऊन नियोजनाप्रमाणे वाहत असतो. भजन- ओव्या- टाळ - मृदंग यांच्या तालात वारी प्रवाहित होऊन आसपासचा परिसर जीवंत करत असते. कुण्या दिंडीत लाऊडस्पिकरचा वापर करुन, कुण्यात रेकॉर्डिंग वापरुन, कुठं तोडांने हरिनाम म्हणत टाळ व टाळीच्या गजरात दिंड्याच्या दिंड्या वाट मागे सारत असतात.
मुख्य पालखीची पोहोच पाहून रस्त्यावरील वाहतुकीची दिशा वळवलेली असते. त्यामुळे रस्त्यावरुन वाहने नुसती चालत असतात. माणसावाहनांनी गजबजून रस्त्याला व गावांना सुगीचे दिवस आलेले असतात.
गावागावातील शाळाशाळांमध्ये वारीचं प्रतिक बालवारकरी साजरे करत असतातच. जेव्हा वारी सायंकाळवेळी गावागावात शिरते तेव्हा सगळ्या गावागावांतून एकच धांदल उडालेली असते. तिचं स्वागत होऊन लगेच लोक किर्तन भजनाला तयार असतात. इतक्या लांब चालत आलो नि थकलो म्हणून अंथरुण न धरता त्या गावातील लोक, या गावात अगदी मनसोक्तपणे मनातील भक्तीभाव उधळत असतात. वारीत आलेले लोक व गावातील लोक मिळून मिसळून गावात विठ्ठल नामाचा जयघोष करतात. प्रत्येक मागील गावावरुन आलेले चैतन्य पुढच्या गावात पेरण्याचं काम हे वारकरी करत असतात. ते जिथंतिथं रुजावं व दरवर्षी त्याची वाढ व्हावी असंच प्रत्येकाला वाटत असावं.
भारुड, खेळ यामुळे तर लहानांपासून म्हातार्यापर्यंत सगळ्यांच्या रक्तात उत्साह भरला जातो. आगळ्यावेगळ्या सुवासांच्या पंगती उठल्या की रात्रभर गावांतून भजन-किर्तन-टाळ-ओव्या यांचा नुसता पाऊसच पडत असतो. पाऊस पडला म्हणजे त्यातून विधायक घडत असतंच, तसंच हे. जमिनीतून पीक तरारुन यावं यासाठी जमिनीला जी मशागत हवी तसं मानवी मन निकोप वाहतं राहण्यासाठी हे आवश्यकच.
लग्नघटिका जसजशी जवळ येऊ लागते अन् पाहुण्यांची, नातेवाईकांची गर्दी वाढत जाते तसं वाखरी, पंढरपूर जवळ आले की आसपासच्या गावागावात वारकर्यांची गर्दी वाढत असते. घराघरात, मंदीरामंदीरात , जागोजागी महाराष्ट्र एकमय झालेला असतो. ही फक्त गर्दी नसते; तिथे वारीचा भाव चराचरात भरलेला असतो. हा भाव या माणसांच्या गर्दीपेक्षाही प्रचंड प्रवाही व अस्तित्ववादी ठरतो. कारण हा वास्तव माणसांनी तयार झालेला असतो.
नदीच्या प्रवाहावर धरण बांधून पाणी साठवलं जावं तसा विठ्ठल स्वत: धरण होऊन सर्व वारकर्यांना कवेत घेण्याच्या तयारीत असतो. त्याने कवेत घ्यावे म्हणून तर वारीचा हा प्रवाह अनेक खाचखळगे पार करत कोसो दूर आलेला असतो.
अशी वारी आमच्याकडे येते. येताना खूप काही घेऊन येते...!
✍🏻फुटूवाली मी
कृष्णा







