Sunday, 14 May 2023

Mothers Day

 आयुष्यात समोर दिसणार्‍या अनेक बाळांच्या वेदनांनी माझं आईपण जागं झालं नि मी 'आई व्हायचं नाही' असं ठरवलं.   


प्रसूतीवेदनांनी आई न होताही समाजातील बाळांच्या वेदना कमी करुन आई होता येतं यावर माझा ठाम विश्वास होता नि आहे. 


स्वत: स्विकारलेलं 'असंच आईपण' जगणं नेमकं कसं असतं? की  ज्याला समाज कायम झिडकारतो. समाजाला समाजाच्या चौकटीतीलच लोक आवडत असतात. त्या चौकटीबाहेरच्या लोकांना समाज एनतेन नाकारत असतो. त्रास देत असतो. आई नसणारी बाई समाजातील 'पुरुषी मानसिकतेला' 'मोकळी बाई' वाटत असते. त्याचबरोबर 'मोकळ्या बाईचा' समाजातील 'आई असणार्‍या स्त्रिया' पुरुषांपेक्षा जास्त अवहेलना करतात.


प्रत्येक बाईची 'तुलना' ही 'या स्त्रीला मूल झालंय का?' या वरुन स्त्रियाच करतात. मूल होणं हीच स्त्रिच्या अस्तित्वाची कसोटी ज्या समाजात समजली जाते त्या समाजात 'पुरुषाकडून आई होणं नाकारणार्‍या' स्त्रिच्या 'अस्तित्वाला' किती झगडावं लागत असेल?


'आई होणं' या समाजाच्या समजेच्या धगीतून बाहेर पडणं म्हणजे काय असतं? आई असण्याच्या खोट्या पुरुषार्थाला बळी न पडतानाचं आयुष्य  कसं असतं? 


आपलं 'आईपण' हे आपण मान्य करण्यावर जन्म घेत असतं न की पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रुढीपरंपरावर.  हे आई होण्याच्या मानसिकतेत असणार्‍या बाईला कधी कळणार?


तसं तर कोणतीच आई होणं सोपं नसतं. दोन्ही प्रकारे आई होण्याच्या प्रसुतीकळा वेगळ्या ठरल्या तरी वेदनेला मात्रा मात्र प्रेमाचीच असते. 


नैसर्गिकरित्या आई होणं हा समाजाच्या प्रवाहाचा भाग असतो नि दुसर्‍या प्रकारे आई होणं म्हणजे समाजप्रवाहाविरुद्ध पोहणं असतं. पोहण्याने तात्पुरता जीव वाचतो पण ध्येय, इच्छा, जिद्द, निर्णयातील ठामपणा असेल तरच किनार्‍याला लागू शकतं. किनारा गाठणं म्हणजेच निर्णयावर ठाम राहणं. हे निर्णयावर ठाम राहणं इतकं का सोप्पं असतं? काय गमावलं जात नाही यात? यादी करुच त्याची तर खूप वाढत जाईल. पण याचा शेवट असतो समाधानात. ज्यासाठी माणूस आयुष्यभर पळत असतो. असं समाधान लाभणं म्हणजेच कल्पोकल्पित 'मुक्ती' असेल तर त्या मुक्तीलायक तुमचे निर्णय तुम्हाला बनवू शकतात अन्  मरणा आधी तुम्ही मुक्तीत जगू शकता. 


काळजातील मातृत्वापेक्षा बांधीलकीतील दातृत्वाची जाग सुद्धा मातृत्वाला मागं टाकू शकते.


समाजातील अनाथ बालकांची आजकालची भयाण परिस्थिती पाहता समाजानंच आई होण्याची गरजंय असं आपल्याला वाटत नाही का?


आईशिवाय जन्मत नसे कोणी.

कोणत्याही विशेष दिनांचं साजरीकरण हे कर्तव्यात साजरं होत असतं. आपण या कर्तव्यासाठी जागं आहोत का?  या जाणीवेनं आजचा दिन साजरा करुया.


Mothers Day!!


✍🏻फुटूवाली मी

      कृष्णा


No comments:

Post a Comment