Sunday, 23 April 2023

पुस्तक दिवस

 *फकिरा*


निराशेच्या कोंडात सापडलेली झुंजार माणसं गांगरत नाहीत. कारण झुंजणं हा त्यांचा स्वभाव बनलेला असतो. मन हे मूळचंच बेडर नसतं. ते अविरत होणाऱ्या आघातांनी निर्भय होतं. जसं पोलाद निखाऱ्यात कैक क्षण तापून बाहेर येतं नि कणखर होतं, तद्वतच त्या सर्वांची मनं जन्मभर दुःखाच्या भट्टीत जळून कणखर झाली होती. असं फकिरा व त्याच्या समाजातील  लोकांचं वर्णन अण्णा भाऊ साठे त्यांच्या 'फकिरा' या कादंबरीत करतात. 


समाजाच्या तळागाळातील साधे सुधे लोक सामाजिक वास्तवरुपी निखार्‍यातून असेच पोलादाप्रमाणे तयार होत असतात. ही प्रत्येक काळात आजपवेतो चालत आलेली व इथून पुढेही चालू राहणारी प्रक्रिया आहे. फकिरानंतर आजपर्यंत असे कितीतरी फकिरा होऊन गेले असतील. म्हणजे जोपर्यंत समाज नावाचा निखारा आहे तोपर्यंत साध्या सुध्यांना कैक क्षण तापावं लागणारच. फकिरा व त्याचा समाज शिकला नव्हता म्हणून त्याच्यावर ही वेळ आली हे त्या परिस्थितीनुसार बरोबर जरी असले तरी आजच्या पुस्तकपढीत समाजात असा काय वेगळा बदल जाणवतो तेव्हा? साचा बदलला तरी आतला माल तोच आहे. अन्यायच करायचा असेल तर त्यात शिकलेले, अडाणी, स्वकीय ,परकीय असे काही भेद असावेच असं आजची परिस्थिती पाहता वाटत नाही. शासन व समाज यांच्यातील लढा कधी संपेल? असा तेव्हा अनुत्तरीत असणारा प्रश्न आजपावेतोही उत्तरीत झालेला नाही. फकीराचा 'गबर्‍या' नावाचा घोडा आजही समाजवास्तवातून पळतच आहे. तो अजूनही वाट पाहत आसावा का की 'अजून एखादा  फकीरा त्याच्यावर मांड टाकेल? म्हणूनच पोलाद तयार होणं ही तेवढी सोपी गोष्ट नसते. त्यासाठी संदेवनशील मन व अन्यायविरुद्ध बंड करणे याची अट ओघाने आलीच. हेच फकीरातून अण्णा भाऊ साठे सांगतात.


फकिरा कादंबरी एक साचा आहे.  या साच्यात वेगवेगळा काळ व त्या काळातील सामाजिक परिस्थिती ओतली की तशाच आशयाची सामाजिक परिस्थिती हुबेहुब तयार होते. अन्याय, भांडवलशाही, गरीब- वंचित लोकांचं शोषण, संघटन तोडण्याचा प्रयत्न अन् फितुरीसारखी लागलेली कीड. फितुरी झाली नसती तर काही काळ का असेना फकिरा व त्याचा समाज अजून अभिमानाने व सुखाने जगला असता. तसंच काळ कोणताही असो एकत्रित संघटन ही गोष्ट किती आवश्यक आहे ही गोष्ट फकिरा वारंवार सांगून जाते. 


गरीबीमुळे पोटासाठी करावी लागणारी अन्नधान्याची चोरी ही खरी तर चोरी नसतेच. त्या त्या काळासाठी परिस्थितीने केलेली adjustment असते. परंतु या adjustment चा शासन गुन्हा किंवा घोर अपराध म्हणून गैरवापर करते. तेव्हा सर्वसामान्यांचं जीणं हे जीणं न राहता शासनाने त्यांची केलेली चक्क फसवणूक असते. 


फकिरा प्रवाही कादंबरी आहे. काळाकाळातून गबर्‍याप्रमाणं तिचं अखंड दौडत राहणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक काळातील समाजाला फकिराची आवश्यकता असतेच. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी फकिराच्या मांग समाजातील एकीही लागते. तरच असे अनेक फकिरा तयार होत राहतील व त्याला साथ देणारा समाजही तयार होईल. 


त्याहीपुढे फकिराच्या भौतिक परिस्थितीत बदल होणे गरजेचे आहे. कारण त्याकाळी सह्यकड्यांनी,  डोंगरझाडींनी फकिराला पोटात घेतले. पण आज सह्यकडा आपल्याला म्हणेल, 'फकिरा अडाणी होता. म्हणून मी त्याला सहाय्य केलं. त्याला पुस्तकांची साथ नव्हती म्हणून मी त्याचा आधार बनलो. पण आज तुम्ही पुस्तकपढीत युगात आहात. मी तुम्हाला साथ देणार नाही. कारण पुस्तके वाचून शहाणं होण्याइतपत तुमचा इतिहासही कणखर होता. भविष्यही असेल. तुम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला बळ देणारी ताकद नक्कीच पुस्तकांत आहे. वर्तमानात त्यांचा वापर करा.'


प्रत्येक समाजवास्तवात ताजं वाटणारं लेखन हेच अण्णा भाऊ साठेंच्या लेखनाचं वैशिष्ट्य. फकिरात काही ठिकाणी उगाच वर्णन केलं आहे. पण एखादाच दोष सोडता ही कादंबरी  प्रत्येक काळातील मनामनावर आरुढ होऊन ती पुढचा काळ गाठत आहे. असंघटीत समाजात प्रेरणा पेरुन पुढचा प्रवास न थकता करत राहील यात शंका नाही.



(पुस्तक दिवस)


✍🏻फुटूवाली मी

      कृष्णा



No comments:

Post a Comment