काल 'बा' ची साकर लो झालती. जोराची चक्कर येतानाच आयनं सावरलं. पटपट च्या, साकर व जेवान दिऊन जरा सुद्दीवर आनलं. पण साकर समदी लो हुनं म्हंजी जित्यापनी मराणच आसतं. त्यज्यानंतर पन बेफाम आशक्तपणा यितू. कायच ग्वाड वाटत न्हाय. जीव नुस्ता बेजार हुतू. काळजाची धड धड हुती. भ्या वाटतं. एकटं वाटतं. संद्याकाळी म्या आल्यावर आयनं मला लो साकरंचं सांगितलं. त्यजामुळं आज बा ला दवाखान्यात आननं क्रमप्राप्त हुतंच. पण सकाळची साळा आसल्यानं व साळंतलं सर सुद्दा त्यंच्या आयला दवाखान्यात रातीच घिऊन गेल्यानं मला साळा गाटनं भागंच हुतं. माज्यापुडं बा ला कसं दवाखान्यात न्याव आसा परस्न पडला. घरी आय, मी व बा. यकट्या किवा त्या दोघास्नी पाटवनं बराबर नव्हतंच.
आमचं जावयबापू नेमकं उपरीला मंजी जवळच्याच गावाला आलं हुतं. त्यनला बा ला दवाखान्यात आकलूजला न्ह्यायला सांगितलं. बा चा दवाखाना बी बा सारकाच आयटदार हाय. पाटं स्हा ला फोनवर नंबर लावाल लागतू. न्हाय लागला तर मग ७ ला जावून परत्यक्ष नंबर लावाव लागतू. आमचं घर ती दवाखाना ३०km आंतर. मग फोनवर नंबर न्हाय लागला तर सकाळी ७ ला जानं शक्य हूत न्हाय. मग आकलूज ला आज मुलानी सरला सांगून नंबर लावला.
जावयबापूला सांगितलं, आल्टू दवाखान्यात घिऊन जावा. तुमची पल्सर घरी ठिवा. साळा सुटल्यावर मी तुमच्या गाडीवर दवाखान्यात यिती मग तुमी तुमच्या घरी जावा. तसंच झालं. म्या सकाळीच साळंत स्कूटीवर गिली. ८ ला जावयबापू बा ला घिऊन दवाखान्यात गेलं. दवाखान्यातच उपाशीपूटीची साकर व जेवल्यानंतरची साकर तपासावी लागती. त्यजामुळं जाताना बा ला जेवनाचा डबा द्याव लागतूच. ही सगळं कराय कशीबी दुपार हुतीच. तवर म्या जानार हुती.
साळा सुटली. घरी आली. स्कूटी ठिवली. जावयबापूची गाडी घितली. आता आसली पलसर चालवायचं मंजी जरा भ्यावंच की. भ्याव ह्यासाटी की घेर ची दूचाकी गाडी लय हातात नसती. कदीतर चालवायचं मंजी जरा दबकतच चालवावी लागती. तसी आदी लय दिवसापूरवी स्प्लेंडर, युनिकार्न, पलसर आजून काय काय गाड्या चालवल्या हुत्या. पण त्या कदीतरीच की. यकदा बुलेट बी चालवली हुती. पन कुंच्याच गाडीचा सराव न्हाय. कदीतर गाडी चालवनं आन् सारकं चालवनं यात फरक आसतूच की. त्यजामुळं वरसा द्वान वरसातनं गाडी चालवायची मंजी कलच, आस्कीलीटर ह्यंचा संबळांग डंबळांग चालू आसनबारच की. त्यातनं नव्या पलसरची बयटक जरा जडच. आन् सार्यात म्हत्त्वाचं मंजी स्कूटीचा बिरेक आसतू ती घेरच्या गाडीचा कलच आसतू आन् सारा डाव हितंच फसतू. पन मला फसून जमतच न्हाय. जबाबदारी म्हत्त्वाची. सारं नीट आटवलं. मंजी यका पायातला बिरेक, डावक्या हातातला कलच, जेवत्या हाताचा आक्सीलिटर, दुसर्या पायातला घेर. मिंदूत सगळं फिट केलं. आन् बा ची माझ्या शिरंवर आसनारी जबाबदारी घिऊन, माजं शिर्यार पलसर ठिऊन म्या पनास साट च्या येगानं निगाली. तवर बा च्या दवाखान्यातल्या तपासन्या झालत्या. डाक्टरकडनं रिपुर्ट घेतला. गोळ्या आवशीदं घितली. पलसर जावयबापूला दिली. आल्टूतनं बा ला घिऊन घरी आली.
सांगायचं कारान मंजी स्कूटी आसू, घेर ची गाडी आसू की चार चाकी आसू. ही शिकायला पायजे. कारण येळ मानसाला सांगून येत न्हाय. कुंचबी काम करायचं मनलं की आपलं लय काय आडू नाय. आपल्या पार्तमिक गरजा भागवन्यापुरतं तरी आपन शिकाय पायजी आसं बा व दादा मंतू. यकाद्याची आडनड भागवनं म्हंजीच आपलं काम यसस्वी हुतं आसं बा व दादचं मननं आसतं.
मला घेरची दुकाची भलंही जोरात येत न्हाय पन हाळूहाळू चालवाय यिती. म्या रेसमदी न्हाय गाडी चालवू शकत पण आडनड भागवायपुरतं मातूर मला जमतंच जमतं. उगं शायनिंग मारायची मनून गाडी हानत नसतू आमी तर गरज मनून आमच्या हातात गाडी आसती. हे मातूर ध्येनात घ्यायची गोस्ट हाय बरं का!!!
(गाडी हाय तवर फुटू काडून घेतला. आता यात काय माजी चूक न्हाय बगा!😇😇.)

No comments:
Post a Comment