'जीवाची मुंबय'
मागील वेळी डिसेंबर महिन्यात मुंबईला (पवई) आल्यावर जीवाची मुंबई काय नि कशी केली सांगायचं बाकी ठेवलं होतं. तसं तर आज पण त्याच ठिकाणी पवईला आलेय. आपण जाईल ते ठिकाण पर्यटन स्थळ असतं. त्यामुळे लहान बहिणीला परीक्षेला परीक्षा सेंटरवर सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान गाठलंय.
उंच उंच व मोठी झाडी असल्याने परीक्षा सेंटरवर जातानाच वाटेत असणार्या या हिरव्या वनराईने माझं लक्ष मागच्या वेळीच वेधून घेतलं होतं. तिची परीक्षा होईपर्यंत मी कुठं बसावं हा तेव्हाचा व आताचा ही प्रश्न या उद्यानाने सोडवला होता. फरक हा आहे की मागच्या वेळेच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. तुलनात्मक दृष्ट्या त्यावेळी माझ्याकडे बहिणीची व माझी अशा दोन सॅक होत्या. आता फक्त पर्स आहे. तेव्हा मला या उद्यानाबद्दल काहीही माहित नव्हतं. आता मात्र मी बिनधास्त येऊन या बाकड्यावर बसून लिहित आहे. तर तेव्हा काय झालं याकडे वळूया.
भरपूर ओझे असणार्या दोन सॅक घेऊन, अनेक उत्सुकतेंचा जुडगा मनाच्या कंबरपट्ट्यात अडकवून मी उद्यानात प्रवेश केला. हे एक रिक्षावाला पाहत होता. अर्थात तो माझ्यामागेही आला. सकाळ आठची वेळ असल्यानं morning walk ला वेगवेगळ्या वयातील लोक उद्यानातून इकडे तिकडे फिरत होते. सॅकचं ओझं माझ्या दोन्ही खांद्याला अडकवल्यानं माझ्या चेहर्यावर तसा थोडा त्रासिक भाव होता. ते ओझं कुठं खाली करता येईल यासाठी मी जागा शोधत होते. उद्यानाच्या गेटच्या आतील बाजूस समोरच कारंजा लावलेली मोठी जागा असते तसा राऊंड होता. मला ती जागा बरी वाटली. सॅक तिथे ठेवून दिल्या व बागेत बॅगकडे लक्ष ठेवत कुठे फिरता येईल असा विचार करत होते. मगाचा रिक्षावालाही माझ्या आजूबाजूला फिरत होता. आज जे माझ्या लक्षात येतं ते त्यावेळी येण्याचं कारण नव्हतं. त्याला अनेक कारणे आहेत ती खालीलप्रमाणे.
पहिलं कारण हे की मुंबईसारख्या ठिकाणी सिमेंटच्या जंगलात मोठमोठ्या झाडांचं लहानसं जंगलच पाहायला मिळावं याचा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. रिकाम्या दोन तासांचा कालावधी या जंगलात घालवायला मिळावा याचा मला परमोच्च आनंद झाला होता. वेगवेगळ्या पक्ष्यांचे, किंड्याचे आवाज मला जास्तच खुणावत होते. मैनेचा चिवचिवाट, खंड्याचा चिर्र र्र र्र र्र र्र, तांबटाचा हूक हूक आवाज त्या सॅक कुठेतरी टाकून मी त्यांचा शोध घ्यावा असं सुचवत होते. विशेष म्हणजे माझ्या डोळ्यासमोरच विविध रंगांची फुलपाखरं इकडे तिकडे पळत होती. मला त्यांचे फोटो काढावयाचे होते. बागेतील अजून कशाकशाचे मला शोध लावून तेही मला फोटोत कैद करायचे होते. बागेत ठिकठिकाणी माझ्याही पोज स्थिर राहणार होत्याच. मला आनेक गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे मला घाई होती. गडबड होती. पण दोन्ही सॅकनी मला जरा अवघडूनच ठेवलं होतं. त्या अनुभवावरुन ठरवलं की पून्हा फिरायला जाताना अंगावरचा एकच ड्रेस घ्यायचा. बाकीचा फापटपसारा उगं वागवायचा नाही. भले एक ड्रेस चार दिवस घालावा लागला तर बेहत्तर!! ते पुढचं सगळं खरं होतं पण सध्या सॅकची सोय लावणं महत्त्वाचं होतं. तुम्हाला सांगते हे जंगलच मला जीवाची मुंबई केल्याचा आनंद देणार होतं. कारण मला जे जे पाहिजे होतं त्यातील बर्याच गोष्टी इथं अनायसे उद्यानात होत्या. तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या मनात चोरांचं चांदणं नव्हतं. मस्तपैकी सकाळच्या वेळचा सुर्याचा लख्ख प्रकाश मनात अन् बागेतही होता.
बागेत ठेवलेल्या सॅकपासून मी ७०-८० मी. वर फिरत होते. तो मगाचा रिक्षावाला सॅककडे गेला. तिच्या आजूबाजूला काहीतरी करु लागला. पण खाकी ड्रेस अंगावर असणारा हा इसम रिक्षावाला नसून बागेतील कामगार असावा असं म्हणत रिक्षावाला ते शिपाई अशी त्याची मी बढती केली. माझं तसंही लक्ष होतं पण मनात चांदणं नव्हतं. कशाला कोण लोकांच्या खाजगी वस्तूला हात लावेल नाही का? मनात प्रश्न घेऊन मी सॅककडे पळत आले. तसा तो बढती मिळालेला कामगार सॅकपासून लांब गेला. तरीही माझ्या मनात चोरी कसली ती आलीच नाही.
बागेच्या एकाच बाजूला किती फिरणार म्हणून सॅक उचलून वाकलेल्या दोन्ही खांद्यांनी शंभरेक मीटर चालत बागेची दुसरी बाजू निवडली. एका बाकावर सॅक ठेऊन झाडावरील पाखरांचे आवाज ऐकत कोण कुठं बसला असेल असे अंदाज काढत फुलपाखरांच्या मागे मी धावू लागले. लोकांप्रमाणेच माझं ते मॉर्निंग वॉक असावं असं काहीजणांना वाटलं देखील असावं. पण सॅक च्या काळजीने मला लांब जाता येत नव्हतं. भुंगा कसा फुलाच्या आसपासच घूं घूं करत उडत असतो तसं सॅकच्या आजूबाजूला माझ्या नजरेचं घूं घूं चालू होतं. अशातच एका झुडूपाच्या पानाच्या मागील बाजूस मला एक फुलपाखरू दिसलं नि मी त्याचे फोटो घेण्यात गुंग झाले. ते करता करता माझं सॅककडं लक्ष गेलं तर मगाचा तो कामगार माझ्या सॅकला हात लावताना दिसला. मी ओरडताच तो थोडा बाजूला जाऊन थांबला.
आता मात्र खरा प्रकार माझ्या लक्षात आला. खाकी वेशातील त्याचा बाणा मला ओळखायला आल्यानं मी चांगलं झापायला सुरुवात केली. चांगल्या हासडून शिव्या दिल्या. 'माणूसकी' बद्दल पा-सात वाक्ये सुनावली. आपल्या मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उपयोग केला. मगापासूनची माझी तगमग शब्दाशब्दातून बाहेर पडू लागली. कदाचित या चोरामुळेच मला बागेत फिरता आलं नाही, माझ्या मनातील माणसांच्या माणुसकीबद्दल असणार्या विचारांना सुरुंग यानेच लावला असं काही वाटून वाटून मी त्याला झापत होते. आजूबाजूची चारपाच माणसं गोळा झाली. सगळा प्रकार मी त्यांना कथन केला. पण ते फार काही बोलले नाहीत. तरीही एकाने त्याला काही विचारताच तेवढ्यात तो चोर म्हणाला,
"मैने क्या किया है? मै तो सिर्फ यहॉं खडा हूॅं। वो मॅम क्या बोल रही है मेरे समज में भी नही आ रहा है। मैने कुछ नही किया।"
मी ते ऐकून आवाक् च! आता मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकात शिरली. अहो तिनं का शिरु नये? तुम्हीच मला सांगा. म्हणजे मी इतक्या शिव्या देऊन त्याला एकही शिवी लागू नये? मी रागवावं अन् त्याला ते कळू नये? माणुसकीच्या चार गोष्टी सांगून त्याला एकही कळू नये? आरं कुठं निऊन ठिवला माझा महाराष्ट्र?
या गोष्टीचा मला इतका राग आला की सांगूच नका. तो आलेला दुप्पट राग आता हिंदीतून पाखडावा लागणार होता. आजूबाजूच्या माणसांनी थोडंफार बोलून त्याला तिथून जायला सांगितलं व तेही गेले. पण माझा आत धुमसत असणारा राग मला गप्प बसू देईना.
लांब चाललेल्या चोराला जोारात ओरडून म्हटलं, "ऐ रुक जरा." आणि आसा त्याला परत झापला की सांगूच नका. अर्ध्या हिंदी अन् अर्ध्या मराठीचा त्याच्यावर किती प्रभाव पडला माहित नाही पण मला जरा शांत वाटलं. त्याच्या चेहर्याकडं पाहिलं तर त्याचा चेहरा निर्वीकार. ते पाहून पून्हा मला राग येऊ लागला. त्याचा हा भाव पाहून 'चोरी कर पण कमीत कमी शिव्या तर समज' अशा आशयाची 'भीक नको पण कुत्रा आवर' सारखी गत झाली.
'चोरी करताना वेगवेगळ्या भाषेचं ज्ञान असू दे, म्हणजे ज्याची चोरी केली त्याचा राग तुला कळेल.' हे त्याला खूप ओरडून सांगावं वाटत होतं पण...
पण तो ऐकायला थांबेल कशाला नाय का?
तर अशी जीवाची मुंबय केलेली लक्षात न राहणार तर नवलच. म्हणून आता फक्त हात हालवतच उद्यानात आलेय. चोर नको, चांदणं नको अन् शिव्या न कळ्यालाचा रागही नको.
✍🏻फुटूवाली मी
कृष्णा

No comments:
Post a Comment