Sunday, 12 August 2018

नामा निराळे


               
                                                                      'नामा'निराळे


      मी 'ATF गृप दोन' (active teacher फोरम)   या WHATSAPP च्या  गटात काही दिवसापूर्वीच सामील झाले होते . तसे तर मी ATF गटामधील फक्त रवींद्र  राऊत सरांनाच ओळखत होते.  ATF च्या संमेलनाची तारीख १३ व १४ मे २०१७ अशी ठरली.  मी संमेलनाची कार्यक्रम पत्रिका वाचली अन् मला त्यात थोडे वेगळेपण जाणवले. मग मी संमेलनाला येण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यावर नम्रताताई रुम मध्ये असल्याने फक्त तिचीच ओळख झाली.  म्हटले चला कमीत कमी एकीच्या ओळखीवर तरी हे दोन दिवस निघून जातील. मग  जेवण करायला गेल्यानंतर मीनलताई ( सौ. भाऊ चासकर ) भेटल्या.त्यांनी आपणहून चौकशी केली. खूपच छान वाटले.मग आम्ही सगळ्यांनी जेवण केले. जेवणात इतर पदार्थांबरोबर भेंडी पण होती.( भेंडीचा खास उल्लेख करण्याचे कारण पुढे आहे. त्यामुळे तिला लक्षात ठेवा.)
         
         13 चा दिवस उजडला. कार्यक्रम सुरु होण्याच्या वेळेला  आम्ही कार्यक्रम स्थाळी पोहोचलो. कार्यक्रम मोठ्या  मध्ये हाॅल होता. जे लोक माझ्या आधी गेले होते त्यातील बरेच जण बाहेरच रेंगाळत होते. एखाद्या     दुस-याला  रेंगाळण्याचे कारण विचारले तर हाॅलमधील AC चालू नसल्याने ते बाहेर आहेत असे समजले. नम्रताताई तर केव्हाच मला सोडून  तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणीत गुल झाली होती. मग म्हटले चला आपण हाॅलमध्ये जाऊन बसुया.

      हाॅल मध्ये प्रवेश केल्यावर एखाद्या सिनेमा थिएटर मध्येच गेल्यासारखे वाटले. कारण हाॅलप्रमाणेच खुर्च्यांची रचनाही तशीच होती. स्टेज च्या समोर डाव्या व उजव्या बाजूला खुर्च्या व बरोबर मधून जाण्यासाठी रस्ता. खालून 4 नं च्या ओळीतील मधून जाणार्या वाटेच्या कडेची मी जागा पकडली.   त्याचे कारण ही तसेच होते. मला स्टेजवरील प्रत्येकजण दिसावा, त्यातल्या त्यात प्रमुख व्याख्याते 'सी आर सर' व 'सुशील शुक्ल सर' शिवाय त्यांचे एेकायलाही यावे म्हणून. एकदाची जागा पकडली व निरिक्षणाला सुरुवात झाली (नाहीतर नवखा माणूस याशिवाय दुसरे  काय करणार??).    हाॅलमध्ये नजर टाकली तर असे लक्षात आले की जो तो AC च्या नावाने ऒरडत होता.  अशा गरमीतही एकमेकांशी चेष्टा मस्करी करायला कोणी मागे नव्हता. सगळे पाहून अगदीच छान वाटत होते. मलाही थोडे गरम होत होतेच की पण जसजसा  वेळ जाऊ लागला तसतसे थोडे बरे वाटू लागले. 

       एवढ्यात एक व्यक्ती माझ्याजवळ येत म्हणाली की ''तुमच्या पलीकडे कोणी बसले नाही ना?''  मी म्हटले ''नाही. तुम्ही बसु शकता.''  (खरे तर ती जागा नम्रतासाठी होती पण... मी शांत बसले.) त्या व्यक्तीचे वर्णन करायचे म्हटले तर जास्त करता येणार नाही पण थोडक्यात सांगते. डोक्याचा अर्धा भाग टक्कल व मोठे डोळे अाणि त्या डोळ्याला साजेलसा चष्मा.( साजेलसा म्हणजे मला तर तो थोडासा मोठ्या भिंगासारखा वाटला..पण नेमकाच सांगू शकत नाही. कारण मी जास्त निरिक्षण केले नाही.)   मग ती व्यक्ती खुर्चीवर न बसता थोडीशी वाकलेल्या आवस्थेत उभी राहिली व डोक्याच्या टक्कल वरून दोन्ही हात फिरवून मस्तपैकी घाम पुसला. मग माझाही रुमाल विसारल्याची जणू काय मला अाठवणच झाली. ''का हो फारच गरम होतेय, नाही का?'' असे म्हणत ती व्यक्ती खुर्चीवर बसली. मी अापला माझा साधा नियम त्यांना सांगितला की '' मी बघा बरं कसे लवकर येऊन बसले म्हणून आता थोडे बरे वाटतेय, तसेच तुम्हीही जरा शांत बसा मग तुमचाही उकाडा कमी होईल.'' त्यांनी माझ्याकडे थोडेसे  तिरपे पाहत, वरून मान खाली घेत,  दोन वेळा ''हं, हं'' म्हटले. 

     एकमेकांना नाव विचारण्याची व ठावठिकाण विचारण्याची जुजबी ओळख झाली. त्यामध्ये त्यांनी 'नामदेव माळी,सांगली' असे सांगितले. मनात विचार केला कुणी ना कुणी कुठून तरी येतच असते त्यात काय एवढे.(?) .... पण त्या व्यक्तीची मात्र सगळ्यांशी ओळख होती. त्यांना सगळे 'नामा' म्हणत होते. एवढ्यात मला रवी सरांनी मेसेज केला होता की तुझ्याशेजारी बसलेले 'नामदेव माळी , साहेब' आहेत.   मनात म्हटले 'असतील कशाचे तरी  साहेब'. ठिक आहे. त्यात काय एवढे.? ..कारण तिथे शिक्षाणाशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी येतात मला एवढेच माहिती होते. 
    
      नंतर त्यांच्या अन् माझ्या  तिथे होणा-या गरमी वरच थोड्या गप्पा झाल्या. मला मात्र त्यांची माझ्याकडे थोडेसे  तिरपे पाहत, वरून मान खाली घेत दोन वेळा ''हं, हं'' म्हणून होकार देण्याची स्टाईल जाम आवडली होती. तशी ती व्यक्ती विनोदी पण होती. त्यांचा प्रत्येकाशी बोलताना विनोदाचा ढंग जाणवत होता.  त्यामुळेच की काय (माझ्या मते)  'कुठलेतरी साहेब' असूनही   मला त्यांच्याशी गप्पा मारायला तेवढे काही वाटले नाही. आणि हो अजूनही AC चालू झाला नव्हता. त्यानंतर काहीच वेळानंतर AC चालू केल्यानंतर थंड हवेच्या आधी जो आवाज येतो ते ऎकूनच या साहेबांना 'थंड' वाटले. तशी त्यांनी कबुलीही दिली होती. ते म्हटले की ''आवाज ऎकूनच थंड वाटू लागलेय.'' मी पण हसत ''हं'' म्हटले. 

      तिथे प्रतिभा ताई भराडे पण आल्या होत्या. त्या मागे बसल्या होत्या. मला तिथली प्रत्येक व्यक्ती अनोळखी होती. प्रत्येकाबद्दल मला कुतुहल होते,  जिज्ञासा होती. प्रतिभाताईंना जवळून  पाहणे ही माझ्यासाठी पर्वणीच होती. कदाचित या साहेबांना पण ती 'पर्वणी' असावी म्हणून मी त्यांना म्हटले की  ''प्रतिभाताई भराडे पण आल्या आहेत, मागे बसल्या आहेत.'' त्यावर त्यांनी एकदा मान हलवून हो म्हटले की दोनदा मान हलवून हो म्हटले, की हो म्हटलेच नाही हे मात्र मला अाता फारसे आठवत नाही.( न आठवण्याचे कारण पुढे मिळेलच).

     YCMOU चे कुलगुरू आले नसल्याने  कार्यक्रम  चालू व्हायला अवकाश होता. त्यामुळे सुजाता ताईंनी वैयक्तीक ओळख व self performance करूयात असे सुचवले. Self performance मध्ये ब-याच  जणांनी आपले कार्यक्रम सादर केले. 'सुरेश सुतार'  यांनी संदिप खरे यांचे  गाणे म्हणायला सुरुवात केली. 'मी मोर्चा नेला नाही,मी संपही केला नाही' हे गाणे ऐकताच लगेच 'ती व्यक्ती' (साहेब ) म्हणाली की या गाण्यात ''भेंडी पण आहे न..''    पण मला ते गाणेच माहिती नव्हते मग मी म्हटले ''रात्रीची भेंडी का????''...त्यांनी हं हं न म्हणता मान हालवून नाही नाही म्हणत म्हटले ''या गाण्यामध्ये भेंडी वगैरे काहीतरी आहे.'' त्यावर  आम्ही दोघेही जरा जास्तच लक्ष देऊन ते गाणे ऎकू लागलो. अन् खरेच की त्या गाण्यामध्ये भेंडी अाली त्याबरोबर आंबा , कांदा , केळे पण होते पण माझ्या मनात मात्र रात्रीची भेंडी व गाण्यातील भेंडी जणू काही फेर धरून नाचू लागल्यासारखे जाणवू लागले. 
(मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही



मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही) असे हे गाणे होते. 


          मी मोबाईल मध्ये काही करायला गेले तर त्यांचे माझ्या मोबाईल कडे लक्ष असावं असं मला जाणवलं. पण मी महत्त्वाच्याच गोष्टी करायचे हं, म्हणजे गाणे रेकाॅर्ड करण्यासाठी रेकाॅर्डर काढणे, फोटो काढण्यासाठी कॅमेरा काढणे इत्यादी. तसे तर मलाही कोणाच्या मोबाईल मध्ये डोके नाही घालू वाटत पण जर माझ्या मोबाईल कडे कोणी पाहत असेल तर....मी का संधी सोडावी....  मीपण चोरून चोरून तीन चार वेळा त्यांच्या मोबाईल मध्ये  पाहिलं..तर स्क्रीनवर एका मुलीचा फोटो होता.  साधारण 7 वी , 8 वी तील असावी. 'माझी दैनंदिनी' अशा हेडिंगचा तो फोटो होता..माझी त्यावर दोनच मते झाली एक तर ती त्यांची मुलगी असावी नाहीतर download करून घेतलेली image असावी. पण तो विचार तिथेच सोडून दिला. 

      माझ्याकडेही पावसाचे गाणे होते.  ते म्हणू की नये या संभ्रमात होते मी. पण रवी सर व या 'साहेबां' नी म्हणा म्हटल्यामुळे मी ते सादर केले.  गाणे सादर करताना  माझ्या पाठिमागे सगळ्यांना ते गाणे म्हणायला सांगितले. सगळ्यांनी(?) ते म्हटलेही मग  मी माझ्या जागेवर येऊन बसले. साहेब म्हणाले ''तुम्ही तर सगळ्यांना सामील करून घेतलेत.'' पण मी त्यांना 'धन्यवाद' म्हटलेच नाही कारण गाणे छान झालेय असे ते कुठे म्हटले मला??...  
     स्टेजवरील performance संपले पण पाहुणे येण्यास अजून वेळ होता. आमच्यातील कोणी उठेना हे पाहून YCMOU चा एक मुलगा whatsapp वरील काहीतरी ' विनोदा' सारखी असणारी कविता सादर करायला आला. अगदी चारच ओळी त्याने  सादर केल्या व मध्येच त्याने आपली जीभ चावली व पटकन स्टेज च्या खाली पळत गेला. तो तसा का गेला हे पाहण्यासाठी आम्ही main entrance कडे पाहिले तर तिकडून चार,पाच व्यक्ती येत होत्या. मी त्या 'साहेबांना' म्हटले ''आता हे कोण आले?'' त्यावर ते म्हणाले ''असतील विद्यापिठाचे कुलगुरू वगैरे.'' म्हणजे हे पण 'अंदाजेच' म्हणत होते हे माझ्या लक्षात यायला काही वेळ नाही लागला. मला किती खात्रीने  ऒळखायला येते हे दाखवण्यासाठी,  मी गप्प बसायचे तर त्यांना म्हटले की, ''हे कुलगुरूच आहेत, नाहीतर तो मुलगा एवढ्या पटकन, जीभ चावत गेलाच नसता कारण आपण कसे  आपले साहेब आल्यावर पटकन बाजुला सरकतो.'' (...)   यावर त्यांना काय म्हाणायचे  होते का नाही माहीत नाही कारण कुलगुरू व इतर पाहुणे आल्याने आम्ही  सगळे उभे राहिलो व पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. 

       पण एक खरं सांगू का ,एवढ्या सगळ्या वेळात ती व्यक्ती कोणते  तरी साहेब आहेत हेच मी विसरून गेले होते. माझ्यासाठी फक्त ती व्यक्ती माझंही एेकून घेणारी, हं हं म्हणणारी, माझ्यापेक्षाही हुशार ( आतापर्यंतच्या जुजबी गोष्टीवरून) , अनोळखी ठिकाणी ओळखीची वाटणारी, त्या ठिकाणी जे काही मनात आहे ते व्यक्त केलेले ऎकून घेणारी  असल्याने त्या व्यक्तीचे काही 'पद' असेल तर ते मी विसरून गेले होते.  ते कोणते साहेब आहेत याचे खरंच मला काही देणं घेणं वाटले नाही. त्यामुळे ......
        त्यानंतर सी. आर. सरांचे  व्याख्यान सुरू झाले, ते इंग्रजीतून असल्याने लक्ष देऊन ऎकू लागलो. मला त्यातील काही भाग  समजायचा ,तर काही भाग drop व्हायचा पण कि'सो'र दा त्याचे मराठीत ट्रान्सलेट करून सांगायचे मग मात्र सगळे समजायचे. त्यातील काही भाग मी टिपून घेत होते. पण एवढी काळजी नक्की घेत होते की माझ्या शेजारी बसलेल्या साहेबांना (?)ते  दिसू नये. नंतर मात्र सी. आर.  सरांच्या मार्गदर्शनातील एक वाक्य मला फार आवडले मी लिहून घेतले व त्या 'साहेबांना म्हटले की ''हे बघा मला सगळ्यात जास्त आवडलेले वाक्य''.मला वाटले ते फक्त 'हं हं' म्हणतील पण त्यांनी चक्क ते वाचूनच काढले. मनात अाले ( ते ही काही क्षणापुरतेच हं) शिक्षणक्षेत्रातील साहेबासारखेच हे तर वाचत आहेत. नंतर काही वेळातच लंच ब्रेक झाला. ते आणि त्यांचे मित्र पटपट पुढे गेल्याचे मी पाहिले. जेवणानंतर कार्यक्रम हाॅलकडे आम्ही अालो पाहते तर काय..?  ते 'साहेब' हाॅलच्या बाहेरच्या बाजूस पुस्तकांच्या स्टाॅलशेजारी उभे. त्यांच्याकडे पाहून मी  थोडे हसल्यासारखे केले अन् नम्रताताई कडे गेले. ती स्टाॅलवर पुस्तके घेत होती. मी आपली सहज नजर फिरवली तर चार पुस्तकापैकी तीन पुस्तकांवर लेखकाचे नाव  'नामदेव माळी' असे लिहिलेले. मनात आले 'अरे ही व्यक्ती पुस्तक विक्रेता तर नाही ना?' आणि चौथ्या पुस्तकाकडे लक्ष गेले तर त्या पुस्तकावरील मुलगी कुठेतरी पाहिल्याचे लक्षात आले. हेेडींग पण तेच होते 'माझी दैनंदिनी'. मग माझी ट्युब पेटली. हाच तो फोटो मगाशी त्या 'साहेबांच्या' मोबाईल स्क्रीन वर होता. नंतर पुस्तके घ्यायची असे ठरवून  मी मात्र कोणताच अंदाज न लावता हाॅलमध्ये चालले तोच लक्षात आले की हाॅलमधील त्याच जागेवर बसायला मिळणार आहे का , की दुसरी जागा पकडावी लागेल. समजा मी दुस-या  जागेवर गेले तर त्या 'साहेबांची' जागा कोण पकडेल?  मी परत त्यांच्याजवळ गेले व ''तुमची मगाचीच जागा पकडू का असे विचारले''  तर ते मान हलवून 'हो' म्हणाले. मग काय?  परत जैसे थे..!!

      सुशील शुक्ल सरांचा कार्यक्रम सुरु झाला. त्यांची भाषा अतिशय लाघवी होती. संपूच नये असे वाटण्यासारखी. त्यांच्या  खूपच खोल अर्थ असणा-या   वेगवेगळ्या ओळी, कविता यांचा आनंद लुटत होतो. बर्याच वेळेला मी म्हणायचे ''छान आहे न'' त्यावर ते 'साहेब' कधी एकदा तर कधी दोन वेळेला  मान हलवून होकार द्यायचे.  प्रोजेक्टवर त्यांच्या कविता पण दाखवल्या जात होत्या. त्यात ही जणू काही साहेबांचे लक्ष नसल्यासारखे मी त्यांना काही ना काही सुचवत होते.  सुशील सरांचेही सादरीकरण संपले मग असे सुचविण्यात आले की आता नामदेव माळी व त्यांच्या  टीम ने स्टेजवर यावे, कारण त्यांना नंतर गावी  जायचे आहे. हे ऎकल्यावर मला कसेतरीच झाले. मी म्हटले ''तुम्ही जाणार आहात का?'' ते म्हणाले ''होय''.    मी म्हटले  '' का बरे?''. ते म्हणे की ''उद्या काम आहे''. मी म्हटले ''हं, काम असल्यावर तर जावेच लागते.'' आणि मग ते पुढे स्टेजवर गेले. ते सत्र संयोजक पण होते हे लक्षात आल्यावर मग मात्र मी मोबाईलमधील  ATF संमेलनाची कार्यक्रम पत्रिका   लक्षपूर्वक वाचली .. त्यात ही सत्र संयोजक म्हणून  'नामदेव माळी , सांगली' असेच होते... आता मात्र मला ते नक्की कोणते 'साहेब' आहेत हे जाणून घेण्याची गरज वाटू लागली.  (मुळात मी कार्यक्रम पत्रिकाच वाचली नव्हती. 13,14 दिवस मी आंतरजिल्हा बदली transfer form भरण्यात इतके हैराण झाले होते की मी बाकी काहीच पाहत नव्हते. त्यामुळे भाऊंनी पहिल्यांदा जी संमेलनाची पत्रिका पाठवली होती ती मी वरवर वाचली होती..मला त्यातून एवढेच समजले होते की नाशिक YCMOU येथे  नामांकीत व्यक्ती येणार आहेत, त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे  आणि मला ते अटेंड करायचे होते. त्याचबरोबर ATF बद्दल जाणून घ्यायचे होते. आणि त्यामुळे .....पुढचे तुम्ही समजू शकता). जेव्हा ते पुढे गेले व जसजसे मला त्यांच्याबद्दल समजू लागले तेव्हा मात्र माझी काय अवस्था झाली असेल मी सांगायला हवेय का?.. साहेब स्टेजवरच होते तरीपण ते ज्या बाजूच्या खुर्चीवर बसले होते तिच्याकडं  पाहण्याचं माझं मात्र  धाडस होत नव्हतं . तरीही पुढे वेगवेगळ्या व्यक्ती सादरिकरण,करत असल्याने तेवढं ओझं वाटलं नाही. त्यांचा कार्यक्रम संपवून जेव्हा ते घरी चालले तेव्हा प्रतिभाताई भराडे पण त्यांच्या सोबत चाललेल्या पाहिल्या....???...???.. अन् मी मात्र मगाशी  त्यांना कोणाची ओळख करून देत होते....??

     संमेलन संपल्यानंतर जेव्हा मी रूममध्ये गेल्यावर नम्रता ताईला सांगितले तेव्हा ती मात्र हसून हसून गर्भगळीत झाली.. मला हसूही येत होते...पण राहून राहुन. दिवसभरातील साहेबांसोबतचे एक एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे राहू लागले.   मी ती रात्र लवकर झोपलेच नाही. My god. मी काय केले होते...हे मलाच माहिती नव्हते. असो.
    
   याबद्दल लिहायचेच असे ठरवून मी शांत झाले. अशोक कोळी सरांच्या म्हणण्यानुसार 'पोटातील सगळे मोकळे केले.'

   आता एक भिती वाटते , भाऊ म्हणतील की "अरे मी 'लेकरांचे अनुभव लिहा म्हणुन सांगतोय.. अन् तू मात्र कोणावर लिहिलेस..?"
     
      नम्रता ताई म्हणते "तू तुझ्या अद्न्यानातील अानंद अनुभवलास."
      
       काहीही असो पण एक माणूस म्हणून मला त्यांचे झालेले  'नामा'निराळे दर्शन व त्यातून झालेले विनोद हे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. चुका तर झाल्याच पण लहानास आपण माफ करालच अशी खात्री वाटते.  


(टीप;-  संबंधित व्यक्ती ही, मिरज  या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी होते. तसेच आता ते   सांगली येथील DICPD मध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत....
नामवंत लेखक व शिक्षण क्षेत्रात प्रयोगकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.)


                                     कृष्णा
               

4 comments:

  1. छान नामा निराळे...👌👌

    ReplyDelete
  2. नामदेव माळी सरांची व माझी ELDP प्रशिक्षण संच निर्मिती मध्ये भेट झालेली, त्यानंतर वेगवेगळ्या प्रशिक्षणात तज्ञ सुलभक म्हणून नेहमीच सरांचे नाव टिपणी व main letter मध्ये घेऊन त्यांना mail करून कॉल केलेला व सुचित केलेले आहे.
    सर एक अत्यंत नम्र व्यक्तिमत्व आहे व सामान्य व्यक्तीबरोबर एकदम सामान्यपणे राहण्याचा त्यांचा गुण वाखवण्याजोगा आहे. सरांबरोबर काम करतांना कधी त्यांनी त्यांच्या कार्याची विशालता जाणवू दिली नाही, खूप सामान्य राहिलेले आहेत. तुझ्यामुळे सरांची एक वेगळी ओळख झाली, छान लिहितेस कृष्णा, अप्रतिम.

    ReplyDelete