पुढे जाण्याअगोदर...
माझे दोन शब्द....
माझ्या आतापर्यंतच्या जीवनातील डी. एड.ची ही दोन वर्षे खूपच अविस्मरणीय गेली. इथं जे काही अनुभवलं, पाहिलं ते या अगोदर कधीच अनुभवलंही नाही अन् पाहिलंही नाही, कदाचित पाहणारही नसेल.
या दोन वर्षांत अनेकांप्रमाणे मलाही गोड-कडू अनुभव येऊन गेले. माझ्या कर्माप्रमाणे मला त्याचं फळ मिळत गेलं. पण काही काही गोष्टी त्याच काळात विसरल्या गेल्या तशाच काही गोष्टी अजूनही तशाच ताज्या आहेत. काही अनुभव विसरण्यासाठीच असतात तर काही अनुभव न विसरण्यासाठी असतात. याहीपेक्षा एखादा अनुभव जेवढा विसरण्याचा प्रयत्न करेल तेवढाच आठवत जातो अन् तोच अविस्मरणीय क्षण बनतो.
त्याचप्रमाणं माझाही एक असाच अनुभव आहे. आता वाचून तुम्ही सांगा हा अनुभव विसरता येण्यासारखा आहे का?
मग...! वाचाल ना ...!!
(टीप:- हे प्रसंगलेखन २००४ साली केलं आहे. जसंच्या तसं टाईप करुन २९ एप्रिलच्या निमित्ताने आजपासून चार पाच भागात हे पोस्ट करत आहे)
++++++++++++++++++++++
एकदाचं आमच्या सरांनी सहलीचा दिवस फिक्स केला आणि काय....! आमच्या सगळ्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. तसं सांगायचं तर पैशांची अगोदरच सगळी तयारी झालेली हे सांगण्याचं कारण म्हणजे हीच मुख्य़ अडचण असायची सगळ्यांची. त्यातूनही आनंदाची गोष्ट म्हणजे सहलीवरून आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी उन्हाळी सुट्टीसाठी आम्ही घरी जाणार होतो. हा सुट्टीचा योग तीन-चार महिन्यातून एकदा येई. त्यावेळी आम्ही घरापासून बरेच लांब होतो. घरी जायचं म्हणजे सर्वात मोठा आनंद असायचा. त्यामुळे एकापाठोपाठ येणार्या 'सहल' अन् 'उन्हाळी सुट्टीमुळे' आनंदाला अगदी घट्ट साय आली होती. त्यामुळे किती गोंधळ घालावा आणि किती नाही हे समजतच नव्हतं.
झालं. सत्तावीस तारीख आली अन् सरांनी सगळ्या सूचना दिल्या. बरोबर काय घ्यायचं, काय नाही इथपासून ते नंतर व्यवस्थित माघारी पोहोचेपर्यंतच्या ज्या ज्या वस्तू लागतील त्या त्या सगळ्यांची यादी सांगितली अन् त्याप्रमाणे आम्ही 'सहलीची बॅग' भरून ठेवली. घरी जाण्यासाठी लागणार्या बॅगा आठ दिवस आधीच भरून ठेवल्या होत्या. त्यामुळे सहलीसाठी ड्रेसची निवड करायला सत्तावीस च्या रात्रीचा बराच वेळ गेला. एकदाचे ड्रेस फिक्स केले अन् बॅगमध्ये भरले. आता फक्त कधी एकदाची पहाट होते याचीच वाट बघत होतो. एकमेकींशी गप्पा मारत जबरदस्तीने डोळे झाकले. लवकर झोपच येईना पण असाच केव्हातरी डोळा लागला.
घड्याळाच्या बेलने एकदम जाग आली. बघते तर पहाटेचे तीन वाजले होते. मला तर पहिल्यापासूनच लवकर उठण्याचा कंटाळा. म्हटलं कुणी एवढ्या लवकर उठायची बेल लावली काय माहिती, पण हे झोपेतच विचार चालू होते आणि एकदमच लक्षात आलं की अरे ! आपण तर गोव्याला जाणार....!!
कधी नाही ते लगेचच सगळंच आवरलं आणि इतर मुलींना आवरण्यासाठी गडबड करायला लागले. वेळेच्या अगोदरच कॉलेजवर पोहचलो. कॉलेजवर थोडी मुले-मुली आली होती. काही जण यायचे होते. आम्ही सगळे बसची वाट बघत बसलो होतो. बस येण्याच्या अगोदर आमची हजेरी झाली. सगळे जण हजर होते. थोड्या वेळात बस आली आणि आमची एकच गडबड उडाली. जो तो बसमध्ये बसण्याच्या घाईत होता. त्यातूनच 'नेहमीच नको असणार्या जड बॅगा' अडथळा आणत होत्या. तशातच बस सुरू होऊन आमचा प्रवास रेल्वे स्थानकाकडे सुरू झाला. थोडय़ाच वेळात आम्ही नियोजित ठिकाणी उतरलो पण रेल्वे यायला उशीर झाला. त्याच कालावधीत आम्ही रत्नागिरीच्या निसर्गाचे निरीक्षण करत होतो. हिरवीगार झाडी, अधूनमधून उंच इमारती शिवाय सकाळचं थोडंसं थंड वातावरण. त्यामुळे खूप वेगळे वेगळे वाटायचं. एवढ्यात पुढेच लक्ष गेलं तर सूर्य नुकताच उगवत होता. तो रत्नागिरीचा पाहिलेला पहिलाच सूर्योदय. मनाला मुग्ध करणारा परिसर व त्यातच हा भर टाकणारा सुर्योदय. फक्त त्या सूर्याकडे बघावं असं वाटायचं. पण हे थोडाच वेळ चाललं कारण रेल्वे येण्याची वेळ झाली. त्यामुळे मुलांचा सगळा लोंढा तिकडेच चालला होता . आम्ही सगळेजण रेल्वेत बसण्यासाठी आतुर झालेलो होतो कारण माझ्याप्रमाणेच बऱ्याच मुलींचा- मुलांचा हा रेल्वेचा प्रवास प्रथमचाच. त्यामुळे आमची उत्सुकता खूपच शिगेला पोहोचली होती. सरांनी सूचना दिलेलीच होती की रेल्वे आली की कोणत्याही डब्यात बसा पण कुणी मागं राहू नका. एवढ्यात रेल्वे आली आणि सगळेजण डब्यात चढू लागले. माझ्या बॅग मुळं मला जरासा चढायला वेळ लागला एवढ्याच सर म्हणजे प्राचार्य मला चढ म्हणून ओरडले. रेल्वेच्या पहिल्या प्रवासाला सुरूवात झाली. पण नियोजनाप्रमाणं बराच उशीर झालेला तरीही रेल्वे मिळाल्यानं रेल्वे मिळू उशीर झाल्याचे एवढं जाणवलं नाही.
रेल्वेत कोणीही कसं कसंही चढल्याने अ व ब तुकडीची मुले एका डब्यात तर थोडी दुसऱ्या डब्यात असं मिक्स झालेलं. मला तर कसं तरीच वाटत होतं कारण अगोदरच्या रात्रीच मुलींनी एकत्र बसून खूप आनंद लुटायचा असं ठरलं होतं पण तसं झालं नाही.
रेल्वेत बसल्यावर वेगळंच वातावरण होते. वेगळाच उत्साह होता. तेव्हा खूप काही विचार डोक्यात यायला लागले. आपण माघारी आल्यावर,घरी गेल्यावर कसं कसं अन् काय काय सांगायचं याचे नियोजन करु लागले. कशीतरी बसायला जागा मिळवली . पण काही मुले दरवाजातच उभी होती . मलाही त्या दरवाजातच उभं राहावंसं वाटायचं पण बरीच मुले तिथं असल्यानं जमलं नाही. काही इतर मुले-मुली एकत्र येऊन गाण्याच्या भेंड्या खेळू लागले पण मला त्यात आवड नव्हती. मी उठले व दरवाजात जाऊन उभी राहिले . बाहेरचा परिसर (उन्हाळ्यातला), झाडे त्या भर्रर्र वार्यात बघायला खूप छान वाटायचं. पण सर रागावतील म्हणून भीतीही वाटायची . तरीही मन आवरायचं नाही आणि सर पण रागावले नाहीत. रेल्वे छोट्या छोट्या बोगद्यातून जात होती . त्याचा घरघर आवाज यायचा. त्या घरघर आवाजात मुले ओरडून त्यांचा आवाज मिसळायचे. असं वातावरण मी तरी कधीच अनुभवलं नव्हतं.
असेच एकामागून एक बोगदे यायचे व मागे जायचे. मी मात्र प्रवासातला खूपच वेळ फक्त दरवाजात उभं राहून घालवला. रेल्वे थांबली की दुसऱ्या डब्यात जायचे इतरांशी गप्पा मारून परत माझ्या ठिकाणी यायचे अशा प्रवासातच गोवा अगदी जवळ आलं पण पोहोचायला बराच उशीर झालेला होता. आम्ही रेल्वेतून उतरलो आणि चालू लागलो. थोड्याच अंतरावर बसेस होत्या. आमच्यासाठी दोन बस होत्या. एक मोठी व एक छोटी. मोठी बस 'अ' तुकडीसाठी छोटी बस 'ब' तुकडीसाठी होती. प्रथम मला आमच्यासाठी असणारी छोटी बस पाहून वाईट वाटलं नाही पण राग आला पण तसंच बसमध्ये बसलो. बसल्यानंतर समजलं की सगळ्यांना पुरेशी जागा आहे. तेव्हा माझा राग कुठे पळून गेला. सगळ्यांनी आपल्याली जागा निवडली. थोड्याच वेळात बस सुरू झाली. गरम तर खूप होत होतं कारण उन्हाळा आणि त्यातून दुपारची वेळ होती. भूक तर त्याहून अधिक लागली हाेती झोपेनं तर कळसच केला होता . तहान भूक झोप यांनी जणू एकत्र यायचं ठरवलं होतं की काय काय माहिती. कधी एकदा नियोजित ठिकाणी जातोय असं झालं होतं. बस चालूच होती. अशातच ड्रायव्हरनं टेप चालू केला. काय आनंद झाला म्हणून सांगू. माझी भूक आणि तहान कुठल्या कुठे पळून गेली कारण प्रवास करताना गाणी ऐकणे ही माझी आवडती गोष्ट आहे . अशातच गाडी आणि गाणी सुरू असताना गाडीत एकदम निरव शांतता पसरली. कोणी वारा घेत बाहेरचं निरीक्षण करण्यात तर कोणी डोळे मिटून गाणी ऐकण्यात तर बरेचजण काही काळ समाधी घेण्यात गुंग झालेले. असा बराच वेळ गेला आणि आमच्या मुक्कामाचे ठिकाण आलं. आता सगळ्यांना एकच घाई की आपली रुममधली जागा (लॉजच्या) पकडण्याची. त्यात आम्ही मुली पण कमी नव्हतो. लगेच पुढे जाऊन आमची जागा फिक्स केली. जेवण केलं पण म्हणावं तेवढं चांगलं झालं नाही. कारण उन्हाळ्यामुळे भाजी खराब झाली होती. जेवण आटोपून तयार झालोच आम्ही गोव्याचं दर्शन घ्यायला.
आमचा गोव्याच्या दर्शनाचा प्रथमचा प्रवास सुरू झाला पण कुठेतरी मरगळ जात नव्हती आम्हाला मंगेश मंदिर पाहायला नेलं. आम्ही मंदिर पाहिलं. दर्शन घेतलं. लगेचच सगळ्यांच्या अगोदर गाडीजवळ आलो मी आणि संगीता पाटीळ. मला मंदीर आवडलं पण यापेक्षा मला वेगळंच काहीतरी पाहायचं होतं. पण या वेळी असा एक किस्सा घडला की आमच्या पायात शांडेल्स असल्याने ते काढण्यास आणि घालण्यास उशीर होई. त्यामुळे आम्ही असे ठरवले की शांडेल्स बसमध्येच काढून ठेवायचे. अन् ठिकाणं पाहायची. त्यापुढे आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. मला गाणी ऐकत प्रवास करावा असं वाटल्याने गाडी बंद होवून गाणी बंद झाली की राग यायचा. असंच थोड्या अंतरावर पुन्हा गाडी थांबली. नाइलाजास्तव उतरले. या अगोदरच शांडेल्सचा तो निर्णय घेतल्याने आम्ही तसंच खाली उतरलो व पुढे चालत दुसरे मंदीर पाहण्यास गेलो. आता दुपारचे तीन ते साडेतीनच्या दरम्यान आम्ही अनवाणी चालत गेलो पहिलं मंदिर दोन हातावरच्या अंतरावर होतं पण आताचं दुसरं मंदिर एवढ्या लांब असेल असा चुकूनही विचार डोक्यात आला नाही आणि बरेच अंतर मी आणि संगीताने पायाला चटके बसत काढले आमच्या या विचारावर हसावं की रडावं तेच कळेना. तिथे दर्शन घेऊन काही ही खरेदी न करता अगोदर पळत पळत आमची बस गाठली. आइस्क्रीम खाल्लं आणि येणार्या इतर मुलांची वाट बघत बसलो. थोड्या वेळात परत आमचा प्रवास सुरू झाला. मधूनच गाईड येऊन आम्हाला आम्ही भेट देणार्या स्थळांची व त्याच्या वैशिष्ट्यांची माहिती देत होता. या पुढचं ठिकाण म्हणजे चर्च. आजवर प्रथमच प्रत्यक्षात पाहिलेला तो चर्च खूपच सुंदर होता. मला पण खूपच आवडला. पण माझ्याकडे कॅमेरा नसल्यानं मी त्याचा फोटो काढू शकले नाही. एवढं सगळं होईपर्यंत सायंकाळ होत आलेली. पुढचे बरेच कार्यक्रम आम्हाला पार पाडावयाचे होते. त्यासाठी तिथून निघण्याची घाई करावी लागली.
आमचा पुढचा प्रवास सुरू झाला त्यात आजूबाजूचं निरीक्षण करतच होतो. डोळे नुसते भिरभिर करत होते. एका जागेला नजर स्थिर होत नव्हती. गाणी, गाडी असाच प्रवास होता. आतापर्यंत सात ते आठ वेळा तरी गाईडने आम्हाला आपण कोणकोणती ठिकाणं पाहणार, त्यांची वैशिष्टय़े कोणती, ती किती अंतरावर आहेत हे सांगितले. तरीही त्याच्या तोंडात मात्र एक वाक्य नेहमी असायचं,"हमको जैसा पाणी चाहीए वैसा नही है. इस लिए हम पानी में उत्तर नही सकते." परंतु त्याचं ते सूचना करणं कोण मनावर घेतं? जो तो वाट पाहत होता त्या पॉईंटची. कारण त्या पॉईंटवर 'एक दुजे के लिये' या सिनेमाचं शूटिंग झालेलं होतं. तो पॉईंट कधी एकदा बघतो असं झालं होतं. गाणेसुद्धा त्याच सिनेमामधील होती. वातावरण अगदीच धुंद झालं होतं. पाणी म्हटलं की काय कुणास ठाऊक पण वेगळंच वाटायचं. शेवटी एकदाचं आम्ही त्या पॉइंटवर पोहचलो. त्या पॉईंटचं नाव होतं 'डोना पौला.'
to be continued
✍🏻फुटूवाली मी
कृष्णा

No comments:
Post a Comment