Saturday, 30 April 2022

२९ एप्रिल २००३ भाग-२



 


शेवटी एकदाचं आम्ही त्या पॉइंटवर पोहोचलो त्या पॉईंटचं नाव होतं 'डोना पौला'.  त्या ठिकाणी जाताना सरांच्या आम्हाला मागून खूपच सूचना येत होत्या तरीही सूचना पाळत त्याठिकाणी गेलो. 

समुद्राच्या कडेला टेकडीसारखं उंच ठिकाण आणि तिथे गच्चीसारखी सोय केलेली. सगळेजण तिथे गेले नि पाहतच बसले. जिकडे नजर टाकावी तिकडे पाणीच पाणी.  किती बघावं तेवढं कमीच. खाली त्या उसळणार्‍या, खडकावर आदळणार्‍या लहान मोठ्या लाटा, लोकांची  लगबग, बेलगाम वारा, सायंकाळची वेळ, सगळेजण कसे आमच्यासारखेच आलेले. जो तो ज्याच्या त्याच्या नादात. वाटायचं असंच आपलं नेहमीचं जीवन असावं, असाच जीवनात कायम आनंद भरलेला असावा.j

तिथेच  खाली त्या पोर्तुगीज जोडप्यांचे पुतळे होते. मला प्रश्न पडला की ते पाण्यात पडल्यावर त्यांचे काय झाले असेल? बहुतेक मोठ्या-मोठ्या माशांनी त्यांना खाल्ले असणार का? असा अंदाज करत इकडे तिकडे फिरत राहिले. काहीवेळानंतर आम्हाला बसकडे जाण्याची सूचना मिळाली पण तिथून पायच निघत नव्हता कारण आजपर्यंत जो समुद्र, त्यातल्या होड्या, बोटी फक्त चित्रात पाहत होते, त्याच प्रत्यक्षात पाहत होते. मग अशा वेळी कोणाचा तरी पाय निघाला असता का ? तसंच मन आवरून  बसकडे आम्ही गेलो. एव्हाना थोडाफार अंधार पडू लागला होता. पाहिलेलं ते संपूर्ण चित्र डोळ्यात साठवून निघालो. कारण अशीच कितीतरी ठिकाणे आम्ही उद्या व आज पाहणार होतो.  पुढं आणखी एक समुद्रकिनारा पाहून  नंतर जहाजात बसण्याचा (लाँचचा) कार्यक्रम होणार होता. शिवाय उद्या दिवसभर फक्त आणि फक्त बीचच बीच पाहणार होतो.  कारण गाइडच्या बोलण्यात फक्त बीचच होते.  त्यां बीचची कल्पना मनात मी करायचे. कसा असेल तो कोणताही बीच, तो पाण्यापासून किती उंचीवर असेल,  तेथून पूर्ण समुद्र कसा दिसत असेल याच विचारात आणि गाण्याच्या धुंदीत शिवाय गाइडच्या सूचनाच आम्ही समुद्र किनारा गाठला.  गाडीतून उतरताना तो तसंच वाक्य म्हणाला की "हम को जैसा पानी चाहिए, वैसा नहीं है।  इसलिए हम पानी में उतर नहीं सकते।" तिथे उतरल्यानंतर रत्नागिरीची मांडवी आठवली. काही मुले पाण्यात गेली होती  पण आम्ही मात्र सर रागावतील म्हणून आणि सूचनांचे पालन करायचे म्हणून दूरूनच पाणी,लाटा , मुलांचा दंगा बघत राहिलो. नंतर लगेचच बसकडे निघालो जाताना कुणीतरी तिथली माती घेतली. आता मात्र घाई झाली होती . कारण महत्त्वाचा कार्यक्रम होता लाँचचा.  पण त्याला ऐंशी रुपये तिकीट असल्याने जास्त कोणी तयारच झाले नाही. सर व मॅडम,  अशीच काही मुले-मुली व गाइड यांची जाण्यासाठी तयारी झाली पण आम्ही मात्र 'कोल्ह्याला द्राक्ष  आंबट' मानत दूरच उभे राहिलो. गेलेली मंडळी येईपर्यंत आम्हाला तिथून थोड्या अंतरावर असणार्या बागेमध्ये बसण्यास सांगितले होते. आम्ही मुली बागेच्या शोधात गेलो.  गोव्याचा कुठला तरी जवळचा पूल पाहिला. तिथे खूप वेळ गेला. बाग काही    सापडता सापडेना. नंतर कुणाला तरी विचारले व बागेत गेल। तिथेच खेळत बसलो. बऱ्याच वेळानंतर म्हणजे आठ ला आम्हाला जाण्याची आठवण झाली. घड्याळ पाहून लगेच निघालो. बसचे ठिकाण ते पण सापडेना. कुणीतरी मुलगा आम्हाला दिसला त्याच्या पाठीमागे आम्ही गेलो तर जवळजवळ सगळेजण गाडीत बसण्याचा गडबडीत होते. आम्ही गेलो बसमध्ये चढताना मीच मागे असल्याने सर म्हणजे प्राचार्य मला रागवले. बसमध्ये बसल्यानंतर मुले मोजली व बस सुरू झाली. कुणी जहाजावरच्या गप्पा मारत होतं, कुणाचं काय तर कोणाचं काय, त्यातच गाईडचं पुन्हा सूचना देण्याचं सुरू झालं पण त्या सूचना 'उद्यासाठी' होत्या. बऱ्याच जणांच्या पोटात कावळ्यांनी कावकाव सुरू केलेली. गाण्याच्या नादात अंधारात, झोपेत मुक्कामाच्या ठिकाणी केव्हा आलो ते समजलंच नाही. त्याचवेळी रात्री साडेसातला विचार आला की उद्या यावेळी आपण रेल्वेत परतीच्या  प्रवासात असू तेव्हा आपण काय काय आणि किती किती अनुभव घेऊन जाणार असू बर!!


सरांनी फ्रेश होऊन जेवण करून घेण्यास सांगितले. सगळ्यांची एकदमच घाई-गर्दी झाली. तशातच आवरून जेवणासाठी बसलो.  हॉटेलमध्ये तिथेही वेटरच्या खूपच उशीरच्या दिलेल्या सेवेमुळे भूक सपाटून लागल्याची जाणीव होऊ लागली.  जेवण ताटात आलं. (पदार्थांची नाव सांगणार नाही.) कोणी तर तशा अवस्थेतही आपला फोटो काढण्यास उत्सुक होते. ज्यांचे त्यांनी फोटो काढले. एकंदरीत खूपच मजेत सगळ्यांची जेवणं झाली. मी मात्र काही खाल्ले नाही . कारण भूकच नव्हती .  नंतर बाहेर चांदण्यात गप्पा मारत सर-मुले-मुली बसले. रात्रभर गप्पाच माराव्यात असं वाटत होतं. कारण मस्तपैकी वाहणारे वारे, टपोरे चांदणे आणि त्यात मजेशीर गप्पा असं वातावरण होतं. पण सरांनी झोपण्यास सांगितल्याने वरती रूममध्ये जावं लागलं. झोपल्यावर झोप कुठे येते कारण कधी उद्याचा दिवस येईल अन् कधी एकदा 'गोवा दर्शन' घडेल असं झालेलं. 


कोणाच्या तरी ओरडण्याने दचकून जागे झाले. तर 'वैशाली पाटील' या आंघोळीचा नंबर लावण्यासाठी पहाटे तीनला उठल्या होत्या. अंधारात कोणाला तरी धडकून पडल्या.  त्यामुळे झोपेतून चांगलेच जागे झालो . एक मुलगी उठेपर्यंत अवकाश, लगेच सगळ्या उठल्या. सगळ्यांनी नंबर लावून अंघोळ करून पाच वाजेपर्यंत आवरून ठेवले. सहा वाजता काही मुले-मुली देवळात फिरायला गेलेे. सर व मॅडम यांची काही इच्छा दिसत नव्हती. कारण त्यांची गडबड ही नव्हती. सगळे जण तयार होऊन बसलो. कारण गाईडने सांगितले होते की सात ला आपल्याला निघायचं आहे. पण सातचे आठ झाले.  सात ते साडे आठ हा वेळ अगदीच रिकामा गेला. कारण बसच आल्या नव्हत्या . त्या वेळेत फोटो काढणे, गप्पा मारणे याशिवाय बरेच काही झाले आणि वाईट वाटायचे की आपला वेळ वाया चालला. म्हणून बसचा बराच राग आला होता कारण बीच पाहण्याची बरीच घाई झालेली होती. त्यानंतर साडेआठला बस आली असावी. मग काय आनंदच आनंद! सगळ्यांनी सगळं सामान घेऊन आपापल्या जागा पकडल्यास सुद्धा!! गाडीत बसतो न बसतो तोच गाईड आला. त्याच्या सूचनांचा पाऊसच पडत होता. त्यातले बरेच थेंब अंगावर पडायचे नाही तर  तसेच वाया जायचे कारण त्यांचं बरंच बोलणं मला तरी समजलं नव्हतं. त्याच्या तोंडात एकच वाक्य सारखं असायचं ते म्हणजे आपण आता बीच पाहणार आहोत. पाण्यात कुणी उतरायचं नाही कारण "जैसा पाणी हमको चाहीए, वैसा नही है।" फक्त हेच वाक्य त्याच्यासोबत आम्ही म्हणत, सूचनांची नक्कल करत  आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. तशी बसमध्ये शांतता होतीच पण काही काही मुले खुडबुड करायची. कोणी  म्हणायचे टेप लावा तर कुणी म्हणायचं नको. अशातच ड्रायव्हरने  आशिकीचे कॅसेट लावले. अन् काय गाणी ऐकण्यासाठी बसमध्ये स्मशान शांतता पसरली. आता मात्र कुणी काहीही न म्हणता गाणी ऐकत, निरीक्षण करत, कधी झोपत होतं. मला मात्र खिडकीतून बाहेरचं निरीक्षण करता येत होते. सकाळचे ९ चे वातावरण, खिडकीतून थोडाफार गार वारा, आशिकीची गाणी, प्रवास, निरीक्षण असं सगळंच कसं माझ्या अगदी मनासारखं होतं. असा क्षण या अगोदर कधीच अनुभवला नव्हता. त्यावेळी काय काय वाटतं ते शब्दांत सांगणं  अशक्य आहे. सगळेजण  शांत पडून गाणे ऐकत होते. गाण्यासोबतच कुणाच्या मनात काय काय विचार येत असतील देवच जाणे कारण वातावरण तसं होतं अन् वयही. पण आमची दुसरी बस होती ती अगदी आमच्या बसच्या विरूध्द. त्या बसमध्ये गाण्याच्या भेंड्यांचा आणि बराच बोलण्याचा आवाज येत होता.  त्यामुळे त्या गाडीत खूपच गोंधळ होता असं जाणवलं. पण त्या क्षणी मला तो गोंधळ आवडला नाही. जवळजवळ एक तास आम्ही गाणी ऐकत होतो. ना सरांच्या सूचनांचा आवाज, ना गाइडच्या.  पण एके ठिकाणी पेट्रोल भरण्यास बस थांबली.  प्राचार्य आमच्या बसमध्ये आले आणि एवढे आश्चर्यचकित झाली की बस्स.!! 


कारण ते गोंधळातून शांततेच्या ठिकाणी आल्याने त्यांना खूपच फरक जाणवला आणि त्यांनी विचार केला असेल की इकडे इतके शांत कसे काय ...!!! म्हणून त्यांनी त्या गाडीप्रमाणे आमच्या गाडीत गाण्याच्या भेंड्या लावल्या अन्  सुरवात केली सुद्धा. तरीपण त्यांना कुणी सहकार्य देईना. कारण 'आशिकी'ची, 'सडक'ची अजून धुंदीच उतरलेली नव्हती. काही मुले व मुली तयार झाले व भेंड्या खेळू लागले. त्यात संगीता पाटील, प्रिया कुंभार, काकासाहेब, राहुल राऊत अशी बरीच मंडळी होती पण मला त्यांचा खूप राग आलेला. कारण आजच असं कुठं एकदम मनासारखं वातावरण मिळालं होतं. 'प्रवास करताना गाणी ऐकणं व निरीक्षण करणं'... पण काय गाण्याच्या भेंड्या खेळणाऱ्या मुलांनी गप्प बसलेल्या मुलांना चिडवायला सुरुवात केली. तेव्हा सगळ्यांचाच अभिमान जागा झाला नि  चहावर गाण्याच्या भेंय़ा सुरू झाल्या . आमचे दोन गट होते. मागची निम्मी व पुढची निम्मी. मी मागच्यात होते. प्रियांका सीमा, संदीप, मंगेश, अविनाश अशी बरीच मुले होती. पुढे इतर मुली व काका, राहुल इत्यादी होते. हळूहळू गाण्याच्या भेंड्या एवढा रंगल्या की बस्स. कोणच हरत नव्हतं. खूप मज्जा आली.  वातावरणानं खूपच धुंदी चढवली होती. प्राचार्य मात्र केव्हाच डुलकी घेऊ लागले होते.  माझं मात्र थोडं बाहेर  तर थोडं आत लक्ष होतं. कारण बाहेर थोड्याच अंतरावर समुद्राचं पाणी लांबच्या लांब पसरलं होतं. 'आपण प्रवास करतोय आणि दोन्ही बाजूने पाणी, मधूनच रस्ता' असा सगळा प्रवास कसा मनासारखा. हा प्रवासच संपू नये असं वाटायचं. एवढ्यात गाडी थांबली. कशाला तरी थांबली असेल कशाला तरी या विचाराने जे ते गाण्याच्या भेंड्यात रंगले होते पण सर गाइड यांच्या मोठ्या आवाजाच्या सूचनांवरून समजलं की कोणता तरी बीच आला म्हणून. लगेच गाइडने आणखी एकदा सूचना दिली की "हमको जैसा पानी चाहिए  वैसा नही है, इस लिए हम पानी में उतर नहीं सकते।"


To be continued 



✍🏻फुटूवाली मी

     कृष्णा

No comments:

Post a Comment