Monday, 20 February 2023

वाकडा फणस

 डीएडला आमच्या बॅचच्या A व B अशा दोन तुकड्या. दोन्हीत ४०, ४० विद्यार्थी. A तुकडीत रत्नागिरीच्या काही मुली व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या काही मुली होत्या. B तुकडीत मी व इतर जिल्ह्याच्या अशा आम्ही दोन्ही तुकडीत मिळून २३ मुली होतो. रत्नागिरीच्या स्थानिक ६ मुली सोडल्या तर बाकी सर्वजण आम्ही एकाच हॉस्टेलला राहायचो. अ तुकडीतील स्थानिक मुलींशी आमचं जास्त बोलणं व्हायचंच नाही. कामापुरते बोलणं झाल्यामुळे त्यांचे स्वभाव तेवढ्या जवळून कधी अनुभवता आले नाहीत. तसंही कोकणातील व घाटातील असं काहीसं आमच्यात अंतर असावं. त्या फुल्ल एन्जॉय करायच्या अन् आम्ही त्यात विशेषत: मी घुम्या बैलासारखी बसायची. क्रिडास्पर्धेला मात्र अ विरुद्ध ब मुली चुरशीने खेळायच्या. कबड्डीत मी व प्रियाने मात्र अ तुकडीला पुढे जाऊ दिलं नाही. याची बोच या अ तुकडीतील मुलींना राहायची. मग तेव्हा मात्र म्हणायच्या 'कृष्णा, फक्त तू अन् प्रियामुळे आम्ही कबड्डीत मागे राहतो.'  अ तुकडीतील मुली मात्र नेहमी काही न काही इव्हेंट मध्ये असायच्या. नृत्यात देखील त्या कोकणी पद्धतीप्रमाणे अग्रेसर असायच्या.  ब तुकडीतही अनेक गुणी मुली होत्या पण गावाकडच्या पद्धतीप्रमाणे म्हणून शांत असायच्या. त्यात मिळणार्‍या संधी या अ तुकडीला जास्त असायच्या. तर अशा वातावरणात रत्नागिरीतील मुलींशी आमचा जास्त परिचय नव्हता. त्यामुळे त्या 'शिष्ट' अशी माझी भावना असायची. 


पण परवा रत्नागिरीत गेल्यावर अ तुकडीतील एकांती व त्याच तुकडीतील अमन(कपल) यांच्या घरी गेले. खरंतर बस ने पोहोचायला मला रात्री ८ वाजून गेले. अमन दाभोळेत न्यायला आला. दाभोळे ते शिपोशी(घर) सात आठ किमी. अंतर. जाता जाता मी अमनला विचारलं. तुझ्या गावच्या बस स्टॉपचं नाव काय? तर 'वाकडा फणस' हे नाव ऐकून मला भारी मजा वाटली. मी म्हटलं, इथले फणस तर सरळ आहेत ना! यावर दोघेही हसलो. 


दोन तीन दिवस मनसोक्त राहून समजलं की अ तुकडीतील एकांती स्पष्टवक्ती, नेटनेटकी, सरळ स्वभावाची व आपुलकी व जिव्हाळा जपणारी आहे. बर्‍याचदा माणूस कोणाचंही लांबूनच मोजमाप करतो. त्यामुळे दोघात एक असंवादाचा फुगा तयार होतो आणि माणूस चुकतो. जवळ आलं की म‍ाणसाचा खरा स्वभाव कळतो. त्यामुळे सुसंवादाने फुगा फुटून त्यांच्यातील अंतर कमी होतं. माणसं अशीच जवळ येत असतात.  


कोकणातील एका वाडीत असलेलं, भातखाचरात व कडेने जंगल असलेले अमन व एकांतीचं घर कोणाला प्रिय होणार नाही. त्यातून मला एकांत अतिशय प्रिय असल्याने अशा ठिकाणचं ममतेचं घर मला सुखावून गेलं. त्यांच्या देवू व कावूचा किलबिलाट घराला घरपण देऊन जातो. 


परगावी ज्या घरात आपल्या घराप्रमाणं मनसोक्त राहायला मिळतं ते घर कधी परकं वाटत नसतं. माझं केलेलं आदरातिथ्य, माझे आ‍वडणारे फ्राय फिश, माझ्या आवडत्या भटकंतीचा केलेला मानपान, त्यासाठी द्याव्या लागणार्‍या वेळेचं नियोजन, मनमोकळ्या मारलेल्या गप्पा, मला दिलेला वेळ यासारख्या सर्व गोष्टीतून एकांतीच्या स्वभावाची झलक समजते. त्यासोबत (आमच्या दृष्टीने) शांत व आपुलकी असलेल्या अमनची तिला असलेली साथ हेही अधोरेखित होतं. त्यामुळेच स्ट्रिक्ट व मायाळू एकांतीचा स्वभाव काटेरी व वाकड्या फणसातील गोड गर्‍यासारखा आहे हे आता वेगळं सांगायला नको. 



✍🏻फुटूवाली मी

      कृष्णा




1 comment:

  1. छान लिहिताय मॅडम.अगदी ओघवत्या भाषेत.फेसबुकवर बऱ्यापैकी तुमचे लेखन मी वाचतो.सहज आणि बोली भाषेतून लिहिलेलं वाचायला नक्कीच छान वाटतं...👌

    ReplyDelete