साखरखा
२००२-२००४ या कालावधीत डीएडला रत्नागिरीला येणं म्हणजे भविष्यातील अनेक सुखांच्या माळेतील मण्याची ती सुरुवात होती खरं; पण हे तेव्हा चुकूनही लक्षात न आलेली गोष्ट होती. 'सुख म्हणजे काय असतं?' हे आता आंबा घाटातून प्रवास करताना जसं कळतं तसं 'दु:ख म्हणजे काय असतं?' यातील दु:खाची व्याप्तीदेखील मागेच त्या दोन वर्षाच्या कालावधीत समजली होती. त्या दु:खाचं कारण होतं 'आंबा घाट अन् वळणावळणाचा रस्ता.'
म्हणजे बारावीपर्यंत प्रवासाची सवयच नव्हती. पन्नास किलोमीटरच्या आतच सगळे पै पाहुणे होते. त्यांच्याकडचा प्रवास हाच लांबचा प्रवास असायचा. त्यामुळे डीएडला पंढरपूर ते रत्नागिरी हा प्रवास म्हणजे लहान मुलाला भलामोठा डोंगरच चढायला लावल्यासारखा होता. सवय नसताना एका दमात एवढा प्रवास तसा सोपा व सुखाचा नव्हताच. रत्नागिरीला जायचंय म्हटलं की मी लगेच आजारी पडायचे. माझं काही न काही दुखणं वर यायचं पण रत्नागिरीला जाण्यावाचून पर्याय नसायचा. प्रवासात कधीतरी ते दुखणंही संपून जायचं कारण खरं दुखणं पुढ्यात मांडून ठेवलेलं असायचं. ते म्हणजे कोल्हापूर ते रत्नागिरी प्रवास. याचं कारण स्पष्ट आहे. या मार्गात असणारे घाट!
पहिली गोष्ट म्हणजे पंढरपूर ते कोल्हापूर या प्रवासाला नाही म्हटलं तरी कमीतकमी सहा तास लागायचे. पंढरपूर ते रत्नागिरी हे अंतर किती तासात कापायचे हे ज्या त्या एसटीच्या हिमतीवर ठरायचं. हे तास सकाळ ते दुपार या कालावधीत कसे तरी संपायचे. दुपार नंतर उपाशीपोटीचा पुढचा प्रवास जीवावर आलेलाच असायचा. अशात कोल्हापूर ते रत्नागिरी हा प्रवासाचा दुसरा टप्पा सुरु व्हायचा. या प्रवासाला बसलं की बसलं लगेच घाटरस्त्याला सुरुवात व्हायची. उलट्या होतात म्हणून घरातून जेवण करु यायचं नाही. घाटात मात्र याचा अजूनच त्रास व्हायचा आणि जेवलं तरीही त्रास व्हायचाच. साधं पाणीही पचायचं नाही. वॉक वॉक करुन तेही बाहेर यायचं. जेवण केलेलं असलं की आधी जेवलेलं सर्व अन्न आंबट चिंबट वासासह बाहेर पडायचं. त्या वासानं कुठून जेवायची दुर्बुद्धी सुचली असं वाटायचं. नंतर थोडं थोडकं पोटातील आहे नाही तेही बाहेर यायचं. आता बाहेर यायलाच काही उरलं नसलं की आतील आतडी बाहेर पडल्यागत व्हायचं. रबर ताणून सोडून दिल्यानंतर रबराला जो दचका बसतो तसा रिकाम्यापोटच्या ओकारीवेळी आतडी जोरात ताणून सोडून दिल्यासारखा आतड्यांना दचका बसायचा. त्यावेळी शिवाजीहाराजांनी अफजलखानाचं बाहेर काढलेलं डेडाळ हमखास आठवून जायचं. कोरड्या उलट्यांचा इतका त्रास व्हायचा की हे सगळं पोट या घाटातच सोडून जावं असं वाटायचं. पण तसं करता येत नसल्याने उलट्यांनी सगळ्या शरीराला अवकळा आलेली असायची.
बस मध्ये बसून प्रवास करणं म्हणजे मोठी परीक्षाच असायची. ती परीक्षा झोपून दिली किंवा जेवढ्या खाली मान घालून बसता येईल तेवढं बसून दिली की सोपी जाई. ताठ मानेनं बसायची कोणाची कॉपी केली तर मात्र कॉपी आंगलूट येईच येई. कोरडेपणी वॉक वॉक होऊन पोटाला पीळ पडण्याचीच ती वेळ असे.
बरं हे अंतरही काही कमी नसायचं. कोल्हापूर ते आंबा, आंबा ते साखरपा, साखरपा ते रत्नागिरी. अशा 'तीन टप्प्यातील कोणता प्रवास अधिक सुखकारक असेल?' या प्रश्नाला तेव्हा कोणतं उत्तरच नव्हतं. अशा आतडीपिळी प्रवासात आंबा घाट उतरलं की पायथ्याचं फक्त साखरपा हे ठिकाण जरा मला बरं वाटायचं. ते यासाठी की तिथं बस काही वेळ थांबायची. या सगळ्या ओघात 'आंबा घाटाचं सौंदर्य' कितीतरी दिवस माहितही झालं नव्हतं.
एकूण प्रवासाच्या कालाचा विचार करता साखरपापर्यंत प्रवास म्हणजे खरंतर ते अंतिम ठिकाण असावं असं वाटायचं. पण तिथून पुढेही रत्नागिरी अजून घाटाघाटातून पन्नाशीत उरलेली असायचीच. ती पन्नाशी जणू अंत पाहायची. साखरप्यात उतरलं की पून्हा बसमध्ये चढायला नकोच वाटायचं. शरीरही उलट्यांनी इतकं थकून जायचं की सरणावर जावं तसं नुसतं मुरगळून बसमधून पळत जायचं. इतका त्रास व्हायचा की ही आपली जीवघेणी हालत सांगायची कोणाला? कारण प्रवासात तर आपण एकटेच! त्यामुळे बस थांबली की थांबली, पळत जाऊन साखरप्यातील स्टॅंडवरील जी दोन चार मोठमोठी झाडे असायची, त्यांना घट्ट मिठी मारुन, जोरजोरात ओरडून सांगावं वाटायचं की, "हेss झाडांनोss, कमीत कमी तुम्ही तरी ऐका रे! मला आता इथून पुढचा प्रवास नकोय; नकोय मला ते डीएड अन् नकोच मला ती रत्नागिरी. झाडांनो तुम्ही तरी मला समजून घ्या ना रे!" पण जीवनप्रवासाप्रमाणे हाही प्रवास अटळच होता.
ही झाली माझी हालत. पण बसचीही घाटातून माझ्यासारखीच अवस्था असेल ना! कारण कोल्हापूर ते आंबा घाट यातील वळणावळणांनी तिचाही ऊर धपापून जायचा. इतका की घाट उतरून साखरप्यात आली की तीही जोरात हुश्श्ssss करायला थांबायची. थोड्या विश्रांतीनंतर पून्हा दाभोळे घाटाला सामोरं जायला तयार असायची.
रत्नागिरीपुढे अजून प्रवास असता तर कदाचित शरीर होत्याचं नव्हतं झालं असतं पण रत्नगिरी हे प्रवासातील शेवटचं ठिकाण हे मानसिक व शारीरिकरित्या मान्य असल्यानं तिथं जाईपर्यंत दम धरायचा. तिथं पोहोचलं की पून्हा शरीरात जीव यायचा. या घाटरस्त्यानं चालणारा प्रवास जीव अगदी नको नकोसा करायचा. पण एवढं करुन भागतं का? नाहीच. पून्हा कधी घरी जाताना रत्नागिरी ते कोल्हापूर हाच रस्ता आधी यायचा. बस व मी असं मिळून दोघींनी पून्हा या सर्व गोष्टी भोगायच्या. साखरपा आलं की बसला घाट चढण्यासाठी उसासा घ्यायला थांबावं लागायचं. उसासा भरुन घेतला की आंब्यातून वळत वळत पळत जायचं. घाटमाथ्यावर आंबा गावात पून्हा स्सूsss करत उसासा सोडायचा.
म्हणजे साखरपा व आंबा ही उसासा घेण्यासाठी व सोडण्यासाठी ठिकाणे असली तरी मला आंबा पेक्षा साखरपा आश्वासक वाटायचा. याला कारण म्हणजे पंढपूर ते रत्नागिरी या लांबपल्ल्याच्या प्रवासात शरीराला थोडीशी स्थिरता मिळण्याचं ठिकाण होतं आणि रत्नागिरी ते पंढरपूर या उलट प्रवासात आधी घाट परिसर व नंतर कोल्हापूरपासून पंढरपूर हा सरळच रस्ता असल्याने व घरच्या ओढीने तेवढा त्रास जाणवायचा नाही. जे हाल पंढरपूरचते रत्नागिरी या प्रवासात व्हायचे ते हाल उलटप्रवासात व्हायचे नाहीत. हे सर्व २००२ ते २००४ या कालातील.
.... पण आता मी करत असलेल्या प्रवासाची हकीकत तुम्ही लांबून का असेना पण ऐकून असालच अशी आशा आहे. आता प्रवासात असे घाट आले तसे लगेच संपून जातात. भले भले घाटही छोटे छोटे वाटतात. घाट अजून मोठे मोठे असायला हवे होते असं वाटून जातं.
परवा रत्नागिरीकडे जाताना साखरप्यात बस थांबली नि त्याकाळची माझी दयनीय अवस्था आठवली. त्या उंच झाडांकडे एक भावूक नजर टाकली. बस थांबली तोपर्यंत झाडांकडे फेरफटका मारला. मिठीही मारावी वाटली पण आवरलं. म्हटलं या 'न मारलेल्या मिठीबद्दल' लिहावं. समजा जरी मी त्यावेळी झाडांना मिठी मारली असती तरी ती साखर खाल्ल्यासारखी गोडच लागली असती असं मला तरी वाटतं. तिखट खाऊन जबर तोंड पोळलं की साखर खाल्ल्यानंतर जसा ती क्षणभर दिलासा देते तसंच या साखरपाचं काम माझ्या पोळणार्या प्रवासात होते. म्हणूनच साखरपाचं नाव साखरपा ऐवजी 'साखरखा' हे माझ्यापुरतं तरी मी ठेवलेलं नाव आहे.
✍🏻फुटूवाली मी
कृष्णा

No comments:
Post a Comment