Thursday, 23 February 2023

पून्हा गोपुरांच्या प्रदेशात- भाग १'

 'पून्हा गोपुरांच्या प्रदेशात- भाग १'






उडूपीला गेल्यावर दाक्षिणात्य पेहराव करण्याची इच्छा झाली.

मनात म्हटलं, लेडिजांनी जीन्स, पॅंट, शर्ट असे पुरुषी पेहराव घातले तर चालतात मग इथे कर्नाटकात मी  लुंगी, कुर्ता व पंचा घातला तर का चालू नये बरे!


मग क्काय! मनात आलं नि कृतीत केलं. 

उडूपीतील श्रीकृष्णमठ- रजतपीठपूरम् इथल्या दर्शनानंतर श्रीकृष्ण मंदिराच्या परिसरात दुकानातून मी व अभिजीत दोघांनी मिळून त्याला व मला असे दोन वेष विकत घेतले. सकाळी घातलेल्या पॅंट शर्टवर तिथंच लुंगी चढवली, खांद्यावर पंजा टाकला.

दुकानदार म्हणाला, "बहोत खूब! अच्छा दिखता है!"

हे वाक्य ऐकून मला तर त्या पेहराव्याच्यावरही मूठभर मांस चढल्यासारखं‍ वाटलं. त्यामुळं 'बहोत खूब! अच्छा दिखता है! ची झालर अंगावर टाकून मी पण तैय्यार झाले. 


मग काय अभिजित व मी दोघांनी मिळून दुकानाच्या बाहेर पाऊल  टाकले की टाकले समोरच्या दुकानांच्या गर्दीतून दोन चार दुकानदार जणू घोरून पाहू लागले..


"हं... यांच्या दुकानातून लुंगी व पंचा खरेदी केला नाही म्हणून बघ कसे बघतायत मेले!" मी.


"नाही मावशे, मी चांगला दिसतोय म्हणून तो पाहतोय." अभि.


अभिच्या पांढर्‍या शर्टवर पांढर्‍या लुंगीला असलेली लाल किनार व लाल-हिरवी किनार असलेला पंचा, असा पेहराव अतिशय छान दिसत होता.  तुलनेत माझ्या  अंगावर पांढर्‍या कुर्त्यावर गडद जांभळी लुंगी व कशीतरी मॅचिंग म्हणून गडद पिवळ्या रंगाचा पंचा. 


अशा पेहरावात व अच्छा दिखता है च्या झालरीत गल्लीतून पुढं गेलो. लोकांच्या काही हावभा‍वावरुन मागे वळून पाहिलं. तर सगळी गल्ली आमच्याकडं टकामका पाहत होती. 


पुढे 'ओल्ड क्वाईन म्युझियम' पाहायला जाताना बाजारपेठ लागली. सगळी बाजारपेठ दुकानाबाहेर डोकावू लागली.


रस्त्यावरच्या हॉटेल्सना आमच्या वेषाचा घमघमाट येऊ लागला. तशा माना बाहेर वाकू लागल्या. 


म्युझियम पाहून आम्ही चालत सिटी बस स्टॅंड गाठले. जाता जाता सर्वांच्या नजरा आमच्या दिशेनेच हलू लागल्या.


आम्ही बसमध्ये चढलो. आख्खी बस टकामका वाहू लागली.


स्टॉपवरुन आम्ही गॅरेजमध्ये गेलो. जिथं आमची गाडी दुरुस्तीला टाकली होती. गॅरेज ओनर तेवढा कोणत्याही प्रकारे आश्चर्यचकीत झाला नाही. 


त्याच्याशी बोलणे करुन लॉजच्या दिशेने चाललो. लॉज ते गॅरेज अंतर एक किमी. या एका किलोमीटरात समोरुन येणार्‍या अनेक गाड्यांचे अचानक ब्रेक लागू लागले. गाडी चालवताना समोर असलेल्या नजरा आमच्याकडे वळून थबकू लागल्या. त्यामध्ये बस काय, ट्रक काय, रिक्षा काय, हरतर्‍हेचं वाहन आमच्याकडेच पाहू लागलं.


शाळकरी पोरी काय, रस्त्यावरचे जाणायेणारे प्रौढ काय, कामावरुन सुटलेले कंपनीतील कामगार काय, रस्त्यात वेगवेगळ्या दुकानातून थांबलेले लोक काय, सगळे सगळे कस्से वकावका नि टकाटका.


"आरं आबड्या, तूला सगळे लोक बघू लागलेत. त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये तू खोळांबा केलास. काढ ती लुंगी नि पंजा अन् घाल पिशवीत. तुझ्यामुळे मला इकडं इकडंही बघता येईना." 


या माझ्याच विनोदावर आम्ही पाचजण कसे खळखळून हसलो. कारण तिथल्या लोकांच्या माझ्या वेषभूषेच्या अपचनाच्या अनुभवाचे साक्षीदार माझ्या सोबतचे सगळेच होते. हसण्याच्या आवाजावरुन पून्हा सगळे आमच्या दिशेकडे  टकामका आन् वकावका. पून्हा आमचं खळखळून हसणं अन् पुढं चालत राहणं. 


माझा दाक्षिणात्य पेहराव साऊथला पचू नये याचं आश्चर्य वाटलं असलं तरी त्यांच्या आश्चर्याच्या वलयात लुंगीतील माझी पावलं आख्ख्या उडूपीत दिवसभर दमदारच पडत राहिली.



✍🏻फुटूवाली मी

      कृष्णा

No comments:

Post a Comment