Friday, 14 April 2023

माझ्या 'बा' ची भाषा

 माझ्या 'बा' ची भाषा



गुरवार दुपारी आय आन् बा उंबरे ला गिलती. काल संद्याकाळी म्हाघारी आली. 

संद्याकाळी जेवताना बा मनला,

"आगं, आगं,आगं! काय नवालच झालंय!"


"काय झालं वो भाव?" मी.


"काय खरं न्हाय. सरकारला तर काय कळत न्हाय. ह्या इस्टीत गर्दी. त्या इस्टीत गर्दी. आन् गर्दी कुनाची तर बायांची. हिकडच्या बी इस्टीत बायकाच, तिकडच्या बी इस्टीत बायकाच. इक्त्या बायका की बूलूच नकू."


"आवं भाव, तुम्हाला कसं फुकट न्हिती इस्टी. कुंच्याबी गावाला. पंच्याहात्तरच्या वरचं ना तुमी! मनून तुमी कुटंबी पळता. तसंच आता बायकान्ला पनास टके सूट हाय मनून जात असत्याला आपापल्या कामाला न्हायतर पै पावन्याकडं."


"मी काय उगं हिकडं तिकडं जात न्हाय. काम आसंल तरच जातू. हुय ना गं?"


"तुमाला काय हुतंय वं? त्यांच्या त्या जात्यात्या. त्यांच्या त्या येत्यात्या. तुमाला काय तरास हाय गा? उगं हुय ना गं आन् न्हाय ना गं." आय.


"काय? खरं सांग बरं. मी कामाशिवाय जातू का ब्हायर इस्टीनं? पन लय लोकांनी इस्टीत गर्दी केल्यावर बसाय जागा बी भेटत न्हाय." आसं मनत यकटंच हासू लागलं.


"काय झालं वो भाव हासायला.?"

 

"आगं, ही बोलताना मला यक आटवलं. म्हातार्‍या मानसान्ला फुकाटंच इस्टी चालू झालती तवाची  गोस्टंय. तर... यक मानूस कोपरगावला चाल्ला हुता. तवा कन्डाक्टरनं त्यला इच्यारलं, 'बिना तिकिटाचं कुटं चाल्लाय आजूबा.? म्या चाल्लूय कोपरगावला. म्हागच्या आटवड्यात माजी तंबाकूची पिशवी इसरलीय लिकीकडं. तवा मनलं, कुटं इकत आनत बसता. इस्टी फुकाट हाय तर चला तंबाकूची पिशवी घिऊन येवाव. मनून चाल्लूय.' आन ही आयकून इस्टीतली सारी मानसं हासाय लागली. इवडूल्या तंबाकूपाय पंडपुरातनं इक्त्या लांब चाल्ला हुता ती मानूस.  तर आशा गमज्या आसतेत यकाकाच्या. पन आज इस्टीतल्या बायका बगून मला आजबच वाटाय लागलं. ती सांगतूय मी." आसं मनत बा नं आर्दी वाटी आंब्याचा रस ताटात वाडून घेतला. तसं म्या जाग्यावरच उडाली.


"भाव, लय रस खाव नगा .आंब्याच्या रसानं साकर वाडंल. आजारी पडचाल. आन् आजारी पडल्यावर तुमची फुकाट इस्टी कामाला येत न्हाय. माज्या आल्टूतनंच घिउन जावाव लागतंय. आल्टू तुमाला फुकाट हाय पन मला त्याल टाकाव लागतंय. आन् तुमाला डाक्टरबी फुकाट तपासत न्हाय. गोळ्या आवशीदं बी फुकाट न्हायती. "


"अंsss. म्या कुटं लय घेटलाय रस. उगं थोडाच घेटलाय. यवड्यानं काय न्हाय होत मला."


"आन् झालं तर... ?"


"न्हाय होत."


 "होगा भाव, मी यकदाच तुमाला सांगती. रस खावून जर तुमी आजारी पडला तर म्या तुमाला इस्टीनंच न्हेनार हाय. किती गा ताप हुईना. (बा च्या दवाखान्यात जाताना तीस किलूमीटरला तीन्दा इस्टी बदलावी लागती.) तुमी फुकाट आन् मी आरद्या तिकिटात. मंजी माजा खर्च वाचंल."


"पुरगी हाय गा कोन हायच मनाव. आपल्या बा ला आसं मंत्याती गाय?"


"मग काळजी घ्येत जावावो तुमी."


"हं.. मला लागली शिकवाय....काळजी घ्या मन.!"


😆😇😆😇😆





✍🏻फुटूवाली मी

     कृष्णा

1 comment: